देशाभरातील टोल वसुली सुरूच राहणार असून, वाहनधारकांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे वक्तव्य निवडणुकीपूर्वी टोलमुक्तीचे आमिष दाखविणारे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वाहतुकदार कल्याण संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील. टोल बंद करता येणार नाहीत. टोल पासून दिलासा देण्याचे मार्ग सरकार शोधत असल्याचे ते म्हणाले. मात्र याबाबतचा तपशील सांगण्यपचे त्यांनी टाळले. टोल वसुली सरकारसाठी महत्वाची आहे. वाहतुकदारांचा इंधनावर होणारा खर्च वाचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ई-टोल प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
 टोल धोरणावर गडकरी मोदींच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी इंधनावरील खर्च कमी करण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच देशातील ११० नद्यांतून जलमार्ग सुरू करण्याच्या विधेयकावर चर्चा करण्यात येणार आहे. याद्वारे वाहतुकीचा खर्च ५० पैसे प्रती किमी एवढा कमी होणार आहे.