इतर राज्यांतून पुरवठा वाढण्याची शक्यता असल्याने किलोला शंभर रुपये भाव असलेल्या टोमॅटोचे भाव येत्या पंधरा दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे, असे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टोमॅटोचे किरकोळ विक्री भाव गगनाला भिडले असून महिनाभर तरी  देशाच्या अनेक भागांत हे दर वाढलेलेच होते. अजूनही टोमॅटोचा भाव १०० रुपये किलो आहे. कोलकाता (९५ रुपये), दिल्ली (९२), मुंबई (८०), चेन्नई (५५) याप्रमाणे २९ जूनला टोमॅटोचे भाव होते. शिमला व बंगळूरु येथे भाव अनुक्रमे ८३ व ७५ रुपये किलो होते. टोमॅटोच्या प्रजाती व दर्जा यावरून टोमॅटोचे दर ठरतात. मध्य प्रदेश व राजस्थानात जोरदार पाऊस झाला असून उत्पादक राज्यांतही पावसाने टोमॅटोचे नुकसान झाले आहे.

वाहतुकीतील अडथळ्यांमुळे उरलेले टोमॅटो बाजारात येऊ शकले नाहीत. पावसाळ्यात वाहतुकीच्या खर्चामुळे टोमॅटोच्या दरात जास्त वाढ झाली आहे. येत्या दोन आठवडय़ांत पुरवठा सुरळीत होईल असे दिल्लीच्या टोमॅटो व्यापारी संघटनेचे अशोक कौशिक यांनी सांगितले. कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र येथील व्यापाऱ्यांशी आम्ही बोललो असून पाऊस कमी झाल्यानंतर टोमॅटो बाजारात पोहोचतील व भाव कमी होतील, असेही ते म्हणाले. टोमॅटो उत्पादनात १५ टक्के वाढ होऊन ते  २०१६-१७ मध्ये १८७ लाख टन होण्याची अपेक्षा असली तरी नुकसानीमुळे हा अंदाज कमीच धरावा लागेल.