ख्यातनाम सितार आणि सूरबहारवादक उस्ताद इम्रत खाँ यांनी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. सरकारने मला पद्मश्री पुरस्कार द्यायला खूप उशीर केला आहे. तसेच सध्या जगभरात असलेली माझी ख्याती आणि सांगीतिक क्षेत्रातील माझ्या योगदानाला तो साजेसा नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. वयाच्या ८२व्या वर्षी हा सन्मान मिळण्यास विलंब झाला असून माझ्यापेक्षा कनिष्ठ लोकांना यापूर्वीच पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. आता माझ्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी भारत सरकार मला हा पुरस्कार देत आहे. मला माहिती आहे की, यामागे सरकारचा हेतू चांगला आहे. माझ्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या असून यामागे कोणतेही पूर्व्रगह नाहीत. पण तरीही हा पुरस्कार मला खूप पूर्वीच मिळाला पाहिजे होता, असे उस्ताद इम्रत खाँ यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर उस्ताद इम्रत खाँ यांनी शिकागो येथील भारतीय दूतावासाला आपण हा पुरस्कार स्विकारणार नसल्याचे कळवले होते. अमेरिकेतील सेंटु लुईस येथे राहणाऱ्या उस्तादजींनी जागतिक पातळीवर भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यात मोठे योगदान दिले आहे. प्रामुख्याने सतार आणि वारसाहक्काने आलेल्या सूरबहार या वाद्यांच्या प्रसारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्येष्ठ बंधू उस्ताद विलायत खाँ, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, उस्ताद अमिदजान थिरकवाँ खाँ आणि पंडीत व्ही.जी. जोग आदी प्रख्यात कलावंतांच्या बरोबरीने इम्रत खाँ यांनी आपली कला सादर केली आहे.

[jwplayer R9Oj8IRh]

केंद्र सरकारकडून बुधवारी नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. पद्म पुरस्कारांच्या निवडीसाठी यावेळी वेगळी पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. केंद्र सरकारने मागील वर्षी मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने पद्म पुरस्कारांसाठीचे कौल मागवले होते. यात मिळालेल्या तब्बल ५,००० प्रवेशिकांमधून डिसेंबर महिन्यात ५०० नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली. क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करून देशाचे नाव उंचावणाऱया मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.