पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथित गोरक्षकांना सुनावलेले खडे बोल, हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची बोचरी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. मोदी यांनी गुरूवारी साबरमती येथे बोलताना कथित गोरक्षकांकडून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले. गोरक्षेच्या नावाखाली लोकांना ठार मारणे, ही गोष्ट कदापि खपवून घेता येण्यासारखी नाही, असे मोदींनी यावेळी म्हटले होते. गायीचे रक्षण करण्यासाठी लोक पुढे येतात आणि माणसांची हत्या करतात. हिंसाचार माजवतात, गोरक्षणाची ही कोणती पद्धत आहे? असा सवालही मोदींनी उपस्थित केला. सत्तेत आल्यापासून भाजप अनेकदा गोरक्षकांच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सातत्याने अडचणीत आला आहे. गोरक्षक हिंदू संघटनांशी संबंधित असल्यामुळे भाजपकडून या सगळ्याकडे कृत्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी टीकाही विरोधकांनी वारंवार केली आहे. मात्र, भाजपकडून निषेध करण्याशिवाय या घटनांविरोधात ठोस असे मत क्वचितच व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या वक्तव्याकडे अनेक अर्थांनी पाहिजे जात आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. मोदींची ही विरोधी भूमिका पुरेशी कणखरही नाही आणि आता मी मांडायची वेळही निघून गेली आहे. तुमची कृती काही वेगळेच सांगत असते तेव्हा शब्दांना काही अर्थ नसतो, असा सणसणीत टोला राहुल यांनी लगावला आहे.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त मोठमोठ्या घोषणा करतात, मात्र त्यांची अंमलबजावणी सोयीस्करपणे विसरतात. गोरक्षणाच्या बाबतीत हिंसाचार सहन करणार नाही म्हणणाऱ्या मोदींनी असल्या हिंसाचारी लोकांनाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे, म्हणूनच गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना ठार करणाऱ्यांची हिंमत वाढते. समाजातल्या असल्या हिंसाचारी लोकांना भाजप आणि संघच पाठिंबा देत असतो. भाजपची ही नीती म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली. मोदींना हिंसा करणाऱ्यांचा एवढाच तिटकारा आहे तर मग राजस्थानमधून पहलू खानचे मारेकरी अजून मोकाट का आहेत? असाही प्रश्न ओवेसी यांनी विचारला.