पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनमधील आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे. तर दुसरीकडे जगभऱातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. जगभरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारहून अधिक झाली आहे.

करोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

हा प्रसार कसा होतो?

करोनाबाधित रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकल्यामधून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून याचा प्रसार होतो. हे तुषार धातूसारख्या कठीण आणि कपडय़ासारख्या मऊ  पृष्ठभागावर काही काळ टिकतात. त्याच वस्तूंना इतर व्यक्तीने हात लावल्यावर त्याच्या हातावर विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असते. हे हात नाक किंवा तोंडाला लावल्याने विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात श्वसनमार्गाद्वारे प्रवेश करू शकतात.

सामाजिक दुरावा पाळणे का आवश्यक

करोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना लक्षणे दिसण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांहून अधिक कालावधी लागतो. संसर्ग समाजात पसरत असल्याने कोणत्या व्यक्तीला झाला आहे की नाही, हे लक्षणे दिसल्यावरच समजू शकते. परंतु तोपर्यंत बाधा झालेल्या व्यक्तींमार्फत नकळतपणे या विषाणूंचा प्रसार आसपासच्या भागात होत असतो. म्हणून कोणत्याही व्यक्तीपासून शक्यतो १ मीटर दूर राहावे, असा सल्ला डॉ. नायर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या डॉ. माला कनेरिया यांनी दिला आहे.

ताप, सर्दी, खोकला याचा संसर्ग झालेला असल्यास..

  •  घराच्या बाहेर अजिबात जाऊ  नये.
  •  घरातील इतरांना संसर्ग पसरू नये यासाठी मास्कचा वापर करावा.
  •  वरचेवर हात स्वच्छ करावेत.
  •  शारीरिक बदलांवर लक्ष ठेवून लक्षणे गंभीर होत असल्यास किंवा शंका असल्यास १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर अधिक माहिती घ्यावी.