पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन अफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर आहेत. सुरुवातीला रवांडा येथे भेट दिल्यानंतर आता ते युगांडा देशात आहेत. दरम्यान त्यांनी युगांडातील कंपालात भारत-युगांडा बिझनेस फोरममध्ये उपस्थितांना संबोधित केले. भारत-युगांडा दरम्यान व्यापारामध्ये असंतुलन असल्याचे यावेळी युगांडाच्या राष्ट्रपतींनी सांगितले. त्यावर हे असंतुलन दूर करणायासाठी मी येथे आलो असल्याचे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, भारत एक कायद्यानुसार चालणारा देश आहे. येथे कर स्थिरता आणि निश्चित कर आकारणी केली जाते. त्यामुळेच भारताला कोणत्याही देशात गुंतवणूक करणे सोपे आहे. जेव्हा अफ्रिका संघर्षाच्या काळातून जात होता. तेव्हा कोणताही देश युगांडासोबत नव्हता. मात्र, आम्ही तेव्हा देखील युगांडा सोबत होतो, याचा इतिहास साक्षी आहे.

दरम्यान, मोदींनी भारतीय उपकरणांचा आपल्या भाषणात उल्लेख करताना एक गोष्ट सांगितली. त्यानुसार त्यांनी युगांडाच्या व्यापाऱ्यांना सांगितले की, सुरुवातीला भारतीय मशिन्स तुम्हाला महागड्या वाटतील. मात्र, त्या अनेक काळ चालणाऱ्या आणि टिकाऊ आहेत. मोदी पुढे म्हणाले, युगांडाजवळ हजारो एकर अशी भूमी आहे ज्यावर अद्याप एक थेंबही केमिकल मिसळलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी तयार होणारा शेतमाल जगासाठी उत्तम असेल. त्यामुळे युगांडाने शेतीवर भर देऊन यात व्यापार वाढवावा आणि स्वतःचा उत्कर्ष साधावा असे मोदी यावेळी म्हणाले.