नवी दिल्ली : राज्यसभेने आणखी कठोर दंडाची तरतूद असलेले मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयक २०१९ पारित केले आहे. राज्य सरकारे दंडाच्या रकमेत आणखी दहापटीपर्यंत वाढ करू शकतात, पण ती कमी करू शकत नाहीत.

हे विधेयक लोकसभेने आधीच पारित केले होते, मात्र परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दुरुस्ती सुचवल्यामुळे ते त्यांच्याकडे परत गेले. विधेयकाच्या मसुद्यात छपाईची चूक असल्याचे परिवहनमंत्र्यांचे म्हणणे होते.

  गुन्ह्यांसाठी दंडाची नवी रक्कम 

* दारू पिऊन वाहन चालवणे : १० हजार रुपये (सध्या २ हजार)

* वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणे : ५ हजार रुपये (सध्या १ हजार)

* विनापरवाना वाहन चालवणे : ५ हजार रुपये (सध्या ५०० रुपये)

* हिट अँड रन केस : मरण पावल्यास २ लाख रुपये (सध्या २५ हजार रु.), गंभीर जखमी झाल्यास ५० हजार रुपये (सध्या १२,५०० रु.)

* भरधाव वेगाने वाहन चालवल्यास हलक्या वाहनांना १ हजार रुपये, तर मध्यम आकाराच्या वाहनांना २ हजार रुपये दंड.

* मर्यादेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्यास प्रत्येक प्रवाशामागे १ हजार रुपये दंड. ‘ओव्हरसाईझ्ड’ वाहनांसाठी ५ हजार रुपये दंड.

* सीट बेल्ट न घातल्यास १ हजार रुपये. (सध्या १०० रुपये)

* दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट न घातल्यास १ हजार रुपये दंड (सध्या १०० रुपये) आणि परवाना रद्द.

* अपात्र ठरवण्यात आल्यानंतरही वाहन चालवल्यास १० हजार रुपये (सध्या ५०० रुपये)

  मुलांच्या गुन्ह्यासाठी पालकांना दंड

* एखादा अल्पवयीन वाहन चालवताना आढळला, तर त्याच्या पालकाला/ वाहन मालकाला २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांची कैद. अल्पवयीन मुलावर बालगुन्हेगार कायद्यानुसार खटला चालवला जाईल आणि वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येईल.

* टॅक्सी सेवा चालवणाऱ्यांनी परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्यास २५ हजार ते १ लाख रुपये दंड.

   विमा दायित्व, भरपाईत वाढ

* थर्ड पार्टी विम्यासाठी आर्थिक दायित्वावर मर्यादा नाही. विमा नुकसानभरपाईच्या रकमेत सध्याच्या ५० हजारांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ.

* सर्व रस्ते वापरकर्त्यांना अनिवार्य विमा पुरवण्यासाठी मोटार वाहन अपघात निधी.

   ऑनलाइन नोंदणी सुविधा

*  वाहन विक्रेत्यांना मोटारीची नोंदणी ऑनलाइन करता येणार.

* शिकाऊ वाहन परवाना ऑनलाइन मिळण्याची सोय. वाहनचालक परवान्यासाठी आधार कार्ड अनिवार्य.