दिल्लीतील निजामुद्दीन पश्चिम येथील मरकजमध्ये तबलिगीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांनी ज्या रेल्वेतून प्रवास केला, त्या पाच रेल्वेगाडय़ातील त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

तबलिगी जमातच्या कार्यक्रमास हजारो लोकांची उपस्थिती होती. त्यांनी ज्या रेल्वेगाडय़ांमधून प्रवास केला. त्यात १३ मार्च व १९ मार्च दरम्यान दिल्लीहून सुटलेल्या गाडय़ांमध्ये दुरांतो एक्स्प्रेस दिल्ली -गुंटूर, ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस दिल्ली – चेन्नई, तमिळनाडू एक्स्प्रेस दिल्ली ते चेन्नई, राजधानी एक्स्प्रेस दिल्ली ते रांची, संपर्क क्रांती एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. या लोकांच्या संपर्कात नेमके किती जण आले होते याचा कुठलाही आकडा रेल्वे खात्याकडे उपलब्ध नाही. प्रत्येक रेल्वेने साधारण १०००-१२०० लोकांनी प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांना धोका असू शकतो.

रेल्वेने त्या गाडय़ांमधील प्रवाशांची माहिती राज्यांना देण्याचे ठरवले असून एपी संपर्क क्रांती एक्स्प्रेसने १० इंडोनेशियन व्यक्तींनी प्रवास केला होता. ते दिल्लीहून करीमनगरला गेला होते. १३ मार्चला हा प्रकार झाला होता. त्यानंतर त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. नवी दिल्ली ते रांची राजधानी एक्स्प्रेस या गाडीत बी १ डब्यात साठ प्रवासी होते. त्यात मलेशियन महिलेने प्रवास केला होता. तिची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. १६ मार्चला एका महिलेने इतर २३ जणांबरोबर झारखंडपर्यंत प्रवास केला होता. त्यातील महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दुरांतो एक्स्प्रेसच्या एस ८ डब्यातून १८ मार्चला तबलीग कार्यक्रमातील दोन जणांनी प्रवास केला होता, ग्रँड ट्रंक एक्स्प्रेसने दोन जण व त्यांची मुले यांनी प्रवास केला होता तर तामीळनाडू एक्स्प्रेसने एका जोडप्याने प्रवास केला होता. ते तबलिगीच्या कार्यक्रमास गेले होते. हजरत निझामुद्दीन स्टेशनवर रोज २ लाख प्रवासी येतात तर नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर ५ लाख प्रवासी येतात.