नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना भल्या मोठ्या रकमेचा दंड भरावा लागत आहे. नागालँडमधील संभलपूरमध्ये एका ट्रक मालकाकडून तब्बल 6,53,100 रूपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.  दंडाच्या या नव्या उच्चांकची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

दहा ऑगस्ट रोजी ट्रकमालकावर संभलपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ही कारवाई केली आहे. रस्ते कर, ध्वनी आणि वायू प्रदुषण, विना परवाना गाडी चालवणे यासह इतर नियम मोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नवीन मोटर वाहतूक कायदा एक सप्टेंबर पासून लागू झाला. पण त्यापूर्वी ट्रक मालकावर जुन्या दरांनुसार कारवाई करण्यात आली. शनिवारपासून या दंडाची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कारवाई झालेल्या ट्रकचालकाचे नाव दिलीप कर्ता तर ट्रकमालकाचे नाव शैलेश शंकरलाल गुप्ता असे आहे. मागील पाच वर्षांपासून गुप्ता यांनी रस्ते कर भरला नव्हता. तसेच ध्वनी आणि वायू प्रदुषण, विना परवाना गाडी चालविणे यासह सामान्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला आहे. शिवाय वाहनाची आवश्‍यक कागदपत्रे (विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आदी) नसल्याने ओडिशाच्या मोटार वाहन कर कायद्यानुसार हा दंड आकारण्यात आला आहे.