दरवर्षी मुंबईला भेडसावणाऱ्या पूरसमस्येवर मात करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एकात्मिक योजना राबवण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. पुराचे पाणी, सांडपाणी ठाण्याकडे वळवून शुद्धीकरणानंतर नाशिक, अहमदनगर आदी शहरांना शेती व औद्योगिक वापरासाठी देता येईल, असे गडकरी यांनी सुचवले आहे.

पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबून जीवित आणि मालमत्ता हानी होते. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान होते. या समस्येतून मुंबईकरांची सुटका करता येऊ शकेल. त्यासाठी पूरनियंत्रण, ड्रेनेज व्यवस्थापन, सांडपाण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचा एकत्रित विचार करणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांकडून प्रकल्प आराखडा तयार करता येईल व त्यात महानगर प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सहभागी करू घेता येईल, असे गडकरी यांचे म्हणणे आहे.

पुराचे पाणी, ड्रेनेज व सांडपाणी ठाण्याकडे वळवून शुद्धीकरणानंतर ते धरणामध्ये साठवता येईल. त्याचा शेतीसाठी, उद्योगांसाठी वापरता येईल. नाशिक, अहमदनगरसारख्या शहरांना फलोत्पादनासाठीही वापरता येईल. अतिरिक्त पाणी टंचाईग्रस्त भागांना पुरवून घरगुती वापरासाठी ते उपयोगी पडेल. मुंबई शहरातील पूरनियंत्रणाची योजना राबवली गेली तर मिठी नदीचाही प्रश्न निकालात काढता येईल. मिठी नदीवर बंधारा बांधून पाणी समुद्रात सोडण्याची व्यवस्था करता येईल, असा उपाय पत्राद्वारे सुचवण्यात आला आहे.

पत्रात काय?

पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था टाळण्यासाठी डांबरीकरणाऐवजी सिमेंट-काँक्रिटचे रस्ते बनवणे अधिक योग्य ठरेल. मुंबई-पुणे महामार्गाचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. मुंबईच्या मोठय़ा वस्त्यांमध्ये पाण्याचा पुनर्वापर केला जाईल अशी यंत्रणा उभी केली तर स्थानिकांचा खर्चही वाचेल. पिण्याच्या पाण्याचा अन्य कामांसाठी होणारा वापरही कमी होईल, अशी सूचनाही गडकरी यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील आदी मंत्र्यांनाही हे पत्र पाठवण्यात आले आहे.