जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात असलेल्या नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. तसेच दहशतवाद्यांकडून दोन आईडी स्फोटही घडवण्यात आले. या स्फोटात घटनेत लष्कराचे एक मेजर आणि एक जवान असे दोघेजण शहीद झाले. पाकिस्तान रेंजर्सच्या बॉर्डर अॅक्शन टीमने गोळीबार केल्याची तर दहशतवाद्यांनी आईडी स्फोट घडवल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय सेनेच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर दहशतवादी लपले, मात्र लष्कराने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं होतं. आता पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला केला असून या हल्ल्यात एका मेजरसह एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रुपमती आणि पुखराणी या दोन ठिकाणी स्फोट झाले. पहिला स्फोट दुपारी साडेचारच्या सुमारास तर दुसरा सहा वाजण्याच्या सुमारास झाला. हे दोन स्फोट नियंत्रण रेषेजवळच्या दहशतवाद्यांनी घडवल्याची शक्यता आहे असे इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या घटनेमध्ये जे जवान जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असेही समजते आहे.