जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन संशोधकांची व्हर्जिनियातील नामांकित विज्ञान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी अरुण जे. सन्याल आणि १८ वर्षीय पार्थिक नायडू यांच्यासह एकूण सहाजणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी २०१८च्या आऊटस्टॅंडिग स्टेम (STEM) पुरस्करांसाठी ही नावे निवडली आहेत. स्टेम (STEM) म्हणजेच, विज्ञान (science), तंत्रज्ञान (technology), अभियांत्रिकी (engineering) आणि गणित (mathematics).

पुरस्कारासाठी निवड झालेल्या सन्याल यांनी यकृत रोग निदान आणि उपचार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केले आहेत. तर, १८ वर्षीय पार्थिक नायडूने कर्करोगाच्या ३डी इंटरॅक्शनचा अभ्यास करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे.

STEM ने व्हर्जिनियातील कुटुंबांना आणि आमच्या अर्थव्यवस्थेला दिलेल्या योगदानाला हे पुरस्कार अधोरेखित करतात. त्यामुळे अथक परिश्रम आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या पुरस्कार्थींचा मी आभारी आहे, असे गव्हर्नर नॉर्थम यांनी सांगितले.

वाचा : अमेरिकेच्या अंतरंगात…

पुरस्कारासाठी निवड झालेले सन्याल हे ‘फॅटी लिव्हर डिजिसेस’ (NASH) मधील तंत्र आणि त्याचे ​​परिणाम यावर आणि मेटॅबोलिक सिंड्रोमची वाढती व्याप्ती आणि जागतिक परिणामांची ओळख करण्याचे निरीक्षण करत आहेत. या निरीक्षणाबद्दल त्यांची व्हर्जिनियातील ‘आऊटस्टँडिंग साइंटिस्ट’ या पुरस्कासाठी निवड करण्यात आली आहे. तर वयाच्या १७ व्या वर्षी पार्थिक नायडूने कर्करोगाच्या ३डी इंटरॅक्शनचा अभ्यास करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. ज्यामध्ये DNALoOPR नावाचे कॉम्प्युटींग टूल तयार करण्यात आले असून, ते सध्या वापरात असलेल्या उपकरणांपेक्षा कर्करोगजन्य डीएनएच्या जैव पध्दतींचे वेगवान, कमी खर्चिक आणि अचूक विश्लेषण करते. या संशोधनाबद्दल त्याची स्टेम आऊटस्टँडिंग पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पार्थिक सध्या स्टँडफर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.