वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून इराणचे कमांडर सुलेमानी यांना ठार करण्यात आल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींनी जोरदार स्वागत केले आहे. मात्र अशा प्रकारचा हल्ला करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला देण्यात आली नव्हती, अशी तक्रार काँग्रेसने केली आहे. ट्रम्प यांच्या कृतीवर डेमोकट्रिक पक्षाने जोरदार टीका केली आहे.

अमेरिकेच्या सार्वभौम प्रांतावर हल्ला करणाऱ्या नेत्यावरच आम्ही हल्ला केला आणि आमचा निर्धार आणि सामर्थ्य दाखविले, असे रिपब्लिकन पक्षाचे नेते केव्हीन मॅकार्टनी यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेच्या नागरिकांना ठार अथवा घायाळ करणाची किंमत चुकती केल्याचे सिनेट सदस्य लिंडसे ग्रॅहम या ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्याने म्हटले आहे.

सिनेट आणि प्रतिनिधीगृहातील दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ सदस्यांना लष्करी कारवाईची पूर्वकल्पना व्हाइट हाऊसकडून दिली जाते, परंतु काँग्रेसशी सल्लामसलत न करताच कारवाई करण्यात आली, कारण सुलेमानी हिंसाचाराचा सूत्रधार असून त्याचे हात अमेरिकेच्या नागरिकांच्या रक्ताने माखलेले आहेत, असे सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डेमोकट्रिक लोकप्रतिनिधी इलियट इंगेल यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

हल्ल्याच्या वृत्तानंतर तेलदरांत वाढ

हाँगकॉँग : अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा कमांडर ठार झाल्याचे वृत्त आल्यानंतर तेलाच्या किमतींमध्ये चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.