News Flash

नीरव मोदीची घरवापसी अटळ, ब्रिटन न्यायालयाचा मोठा निर्णय

भारत प्रत्यार्पणाच्या विरोधातली त्याची याचिका ब्रिटन न्यायालयाने फेटाळली आहे

नीरव मोदीची भारत प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटन न्यायालयाने फेटाळली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातला फरार हिरा व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनच्या न्यायालयाने आता चांगलाच झटका दिला आहे. भारत प्रत्यार्पणाच्या विरोधातली त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकेला कोणताही आधार नसल्याचं सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी १४ हजार कोटींचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने नीरव मोदीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
ब्रिटनमध्ये स्थानिक न्यायालयात न्या. सॅम्युएल गुझी यांच्यापुढे दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. भारतामध्ये सुरू असलेल्या खटल्यात नीरवला तिथे हजर राहावे लागेल, असे न्या. गुझी यांनी स्पष्ट केले होते.


आणखी वाचा- विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका! ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित

नीरव याच्या विरोधातील खटल्याची भारतीय न्यायालयांत नि:पक्षपाती सुनावणी होणार नाही, हा दावाही ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळला होता. तसेच नीरव याच्या वैद्यकीय गरजांची पूर्तता भारतात करण्यात येणार नाहीत, हा दावाही न्यायालयाने अमान्य केला होता. या प्रकरणात प्रथमदर्शनी नीरव मोदी याच्या विरोधात पुरावे दिसत असल्याचेही न्या. गुझी यांनी स्पष्ट केले होते.

ब्रिटन प्रत्यार्पण कायदा २००३ नुसार न्यायाधीशांनी अपला निवड्याचा अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला होता. अखेर गृहमंत्री प्रीती पटेल यांनी प्रत्यार्पणास मंजुरी दिल्याचे ब्रिटनमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी नीरवला १३ मार्च २०१९ रोजी अटक केली. तेव्हापासून तो वॉण्ड्स्वर्थ कारागृहात आहे.

हेही वाचा- नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी

सीबीआयने ३१ जानेवारी २०१८ रोजी नीरव, मेहुल चोक्सी आणि बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. आरोपींनी संगनमत करून कट रचला आणि सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेची फसवणूक केली, अशी तक्रार बँकेने नोंदविली होती. मेहुल चोक्सी याने अशीच फसवणूक केल्याचे उजेडात आल्यानंतर बँकेची १४ हजार कोटींची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 5:29 pm

Web Title: uk court rejects nirav modis plea challenging extradition to india vsk 98
Next Stories
1 रामदेव बाबा विरुद्ध अ‍ॅलोपॅथी डॉक्टर प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात
2 क्रूरपणाचा कळस! Insuranceच्या पैश्यांसाठी नऊ वर्षांच्या चिमुकलीचा बळी
3 “काँग्रेस आघाडीसाठी कुमकुवत, विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवणार”
Just Now!
X