लंडन : बर्मिगहॅम येथील चार मशिदींवर रात्री उशिरा झालेल्या हल्ल्याचा तपास वेस्ट मिडलॅण्ड पोलीस करीत आहे. गुरुवारी रात्री उशिरा हातोडय़ाने मशिदीच्या खिडक्या तोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना असाच प्रकार दुसऱ्या एका मशिदीत होत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी गस्त सुरू केली आणि मशिदींचे नक्की किती नुकसान झाले याचाही तपास सुरू केला. रात्री झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना शोधण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक आणि पोलीस एकत्र तपास करीत आहेत. पुरावे तपासण्याचे काम फोरेन्सिक अधिकारी अधिकारी करीत असून सीसीटीव्हीचेही चित्रण पाहिले जाणार असल्याचे मुख्य कॉन्स्टेबल डेव थॉम्पसन यांनी सांगितले.

न्यूझीलंडमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यानंतर ब्रिटिश पोलीस प्रमुखांनी मशिदींसमोर गस्त घातली जाईल, असे जाहीर केले होते. ब्रिटनमध्ये इस्लामोफोबिया वाढत चालला असल्याबाबत दहशतवाद विरोधी गटांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.