परिस्थिती चिघळण्याची भीती; बळाचा वापर केल्याचा नागरिकांचा आरोप

इस्रायली सैन्याशी चकमकीत १६ पॅलेस्टिनी ठार तर इतर शेकडो जण जखमी झाल्याच्या प्रकरणी स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी केले आहे.

इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात गाझा पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने हिंसाचार आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. गट्रेस यांनी पारदर्शक व निष्पक्ष चौकशीचे आवाहन केले असून शांतता प्रयत्नांना नवे रूप देण्याची तयारी दर्शवली आहे असे त्यांचे प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले. संबंधित गटांनी हिंसाचार चिघळणार नाही याची दक्षता घ्यावी, नागरिकांना त्याची झळ बसू  देऊ नये असे त्यांनी म्हटले आहे. २०१४ च्या गाझा युद्धानंतर एकाच दिवशी एवढे लोक मारले गेल्याची घटना प्रथमच घडली असून कुवेतने त्यावर तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे राजकीय सरचिटणीस ताय ब्रुक झेरीहॉन यांनी सांगितले की, आगामी काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ब्रिटन व अमेरिका यांनी प्राणहानीबाबत दु:ख व्यक्त केले असले तरी सुरक्षा मंडळाने समतोल विचार करण्याची गरज प्रतिपादन केली आहे.

हमासच हिंसाचाराला जबाबदार आहे असा आरोप संयुक्त राष्ट्रातील इस्रायली राजदूत डॅनी डॅनन यांनी केला आहे. पासओव्हर हा सुटीचा दिवस साजरा करण्यासाठी जगातील यहुदी लोक एकत्र जमले असताना हा हिंसाचार करण्यात आला. इस्रायलच्या निर्मितीपासूनच्या पॅलेस्टिनी शरणार्थीना परत घेण्यात यावे या मागणीसाठी गाझापट्टीतील लोकांनी इस्रायली सीमेवर मोर्चा काढला होता त्यावेळी इस्रायली सैन्याने अश्रुधुराचा वापर करून आगी लावल्या. इस्रायली तोफगोळे व हवाई हल्ल्यांनी हमासच्या तीन ठिकाणांचा वेध घेतला. गाझातील आरोग्य मंत्रालयाने १६ पॅलेस्टिनी  ठार  झाल्याचे म्हटले असून १४०० जण जखमी  झाले आहेत. त्यात ७५८ लोक आगीत जखमी झाले. काही जण रबरी गोळ्या व अश्रुधुराने जखमी झाले. इस्रायलने बळाचा अतिरेकी वापर केला असा आरोप पॅलेस्टिनी  लोकांनी केला आहे.