निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटक प्रकरणामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसून राज्यातील सरकार भक्कम असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिला.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’कडे देण्यात आला आहे. मात्र, या गंभीर प्रकरणाच्या हाताळणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही नाराज असल्याच्या चर्चांना पवारांनी विराम दिला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सरकार चालवत असून त्याला कोणताही धोका नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष मिळून मिसळून काम करत आहे. काही अडचणी येत असतात, पण त्यातून तोडगा काढला जातो, असे पवार म्हणाले.

देशमुखांची पाठराखण

‘‘ही तर माझ्यासाठीदेखील नवी माहिती झाली,’’ असे म्हणत पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली. स्फोटकांचा तपास व वाझे प्रकरण महाविकास आघाडी सरकारने योग्यरीत्या हाताळले. राज्याच्या गृहमंत्रालयाने जबाबदारीने काम केले, त्यामुळे या प्रकरणातील संबंधित लोक उघडे पडले. त्यांच्याविरोधात कठोर कारवाईही केली, असे सांगत पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणा चौकशा करते, तेव्हा तिला सहकार्य करणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, असे सांगत पवार यांनी सचिन वाझे यांचे नाव न घेता टीका केली. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पदावरून हटवण्यासंदर्भात मात्र पवारांनी भाष्य केले नाही. बदल्या-नियुक्त्यांशी आपला संबंध नसून हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांशी फक्त विकासाच्या मुद्द्यावर धोरण ठरवण्यासाठी भेट होत असते, असे पवार म्हणाले.

चाकोंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलेले केरळमधील ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपविरोधात मजबूत विरोधी फळी उभी करण्याच्या प्रयत्न केला जात असून केरळमध्ये सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांच्या आघाडीचा आपण प्रचार करणार असल्याचे चाको म्हणाले. केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस डावी आघाडीत सहभागी झालेली आहे.