Unnao Rape Case: उन्नाव बलात्कारातील मुख्य आरोपी आणि भाजपातून निलंबित करण्यात आलेला आमदार कुलदीप सिंह सेनगर याचा फोटो असणारा शुभेच्छा देणारी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात छापण्यात आली आहे. पहिल्या पानावर असणाऱ्या या जाहिरातीत स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचेही फोटो छापण्यात आले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, वृत्तपत्रात देण्यात आलेली ही जाहिरात उन्नाव नगर पंचायतीचे अध्यक्ष अनुज कुमार दिक्षित यांनी छापली आहे.

अनुज कुमार दिक्षित यांना या जाहिरातीबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “ते आमच्या मतदारसंघातील आमदार आहेत. यामुळेच त्यांचा फोटो छापण्यात आला आहे. कुलदीप सिंह सेनगर जोपर्यंत आमचे आमदार राहणार, तोपर्यंत त्यांचे फोटो छापत राहणार. मी जाहिरातीत कोणत्याही पक्षाचा उल्लेख केलेला नाही”.

भाजपाने मात्र यापासून दूर राहणंच पसंत केलं. सेनगरचा फोटो छापणं अथवा नाही हे प्रत्येकाची वैयक्तिक निवड असू शकते. पक्ष किंवा राज्य सरकारचं त्याच्याशी काही देणं-घेणं नाही असं पक्षाचे प्रवक्ता शलभमणी त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.