सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात उत्तर प्रदेशचे मंत्री गायत्री प्रजापती यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट आणि लूक-आउट नोटीस बजावली आहे. त्यांच्याबरोबर इतर सहा साथीदारांविरोधातही वारंट बजावण्यात आले आहे. त्यांना शोधण्यासाठी लखनौ, कानपूर, अमेठी या ठिकाणी छापे मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रजापती यांचा पासपोर्ट चार महिन्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यांना शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. प्रजापती हे अमेठी येथून समाजवादी पक्षातर्फे निवडून आले होते. यावेळी देखील ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावरुन निवडणूक लढवत आहेत. बुंदेलखंड भागातील महिलेनी त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहे.

प्रजापती यांचा साथीदार आपल्याकडे आला आणि खाणीमध्ये काम लावून देतो असे त्याने म्हटले. त्यासाठी आपल्यासोबत यावे लागेल असे त्याने महिलेला म्हटले होते. त्यानंतर त्याने तिला प्रजापती यांच्या गौतमपल्ली येथील शासकीय निवासस्थानी नेले. असे तक्रारीमध्ये लिहिले आहे.

२०१४ मध्ये तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापलेले असताना प्रजापती यांना मिळालेल्या नोटीसमुळे समाजवादीला फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपण चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करू असे म्हटले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून हवे ते सर्व सहकार्य करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

प्रजापती हे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानावर लपून बसलेले आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते केशव प्रसाद मौर्य यांनी केला होता. जर माझ्या घरात ते लपलेले असतील तर माझ्या घराची झडती घ्यावी असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते. नुसतीच झडती नका घेऊ हवं तर माझ्या घरी सर्व माध्यमांना घेऊन या असे देखील अखिलेश यादव यांनी म्हटले होते.

प्रजापती हे २७ फेब्रुवारीनंतर सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. २७ फेब्रुवारीला ते प्रचार करत होते. निवडणुकीबद्दल काय वाटते असे विचारले असता आपण मोठ्या मताधिक्याने जिंकू असे त्यांनी म्हटले होते. सर्व विमानतळावर पोलिसांनी पहारा ठेवावा अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. प्रजापती यांनी परदेशात पळून जाता कामा नये, या दृष्टीने या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रजापती यांच्यावरुन समाजवादीला चिमटे काढले होते. समाजवादी पक्षामध्ये केवळ प्रजापती यांच्या नावाचा जप केला जातो असे त्यांनी जौनपूर येथील प्रचारसभेत म्हटले.