उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना आश्रय देत असल्यानेच राज्यात महिलांविरोधातील गुन्हे वाढत असल्याचा आरोप  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे.

सामूहिक बलात्कारानंतर पेटवून देण्यात आलेल्या उन्नावच्या पीडित महिलेचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी तिच्या कुटुंबीयांची उन्नाव जिल्ह्य़ातील तिच्या गावी जाऊन भेट घेतली.  कुटुंबीयांनी पीडितेवरील अत्याचाराची  सगळी हकीगत प्रियंका यांना सांगितली. त्यानंतर प्रियंका म्हणाल्या की, ‘‘बराच काळ त्यांच्या मुलीला गुन्हेगारांनी छळले होते. त्यांच्याच कुटुंबातील एका तरुण मुलीला तिचे नाव शाळेतून काढण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे ती शाळेत जात नाही. तिच्या वडिलांना मारहाण झाली. त्यांचे शेत जूनमध्ये पेटवण्यात आले. या कुटुंबाची सर्व पद्धतीने छळवणूक करण्यात आली. त्यानंतर पीडित मुलीला पेटवून देण्याची टोकाची कृती गुन्हेगारांनी केली.’’ या सगळ्या प्रकरणात सरपंचाचा संबंध असल्याची चर्चा आहे. तो भाजपचा आहे. या सरपंचाला अभय देण्यात आले असावे. काही प्रमुख आरोपींना सरकारनेच संरक्षण दिले आहे, असा आरोप प्रियंका यांनी केला. अशा घटनांच्या मुद्दय़ावर कुणी राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या.