युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियाच्या शस्त्रधारी गटांवर कारवाई करणाऱ्या युक्रेन सरकारला अमेरिकेच्या ओबामा प्रशासनाने पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. युक्रेनमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा त्यांच्या सरकारला पूर्ण अधिकार आहे, असे ओबामा प्रशासनाने बुधवारी सांगितले.
‘‘युक्रेनच्या पूर्व भागात रशियाच्या शस्त्रधारी गटांनी घुसखोरी केल्याने तेथील परिस्थिती चिघळलेली आहे. त्यामुळे तिथे शांतता प्रस्थापित करणे ही युक्रेनच्या सरकारची जबाबदारी आहे. या गटांनी देश सोडून जाण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे,’’ असे व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जे कार्ने यांनी सांगितले.
युक्रेनच्या सरकारने घुसखोरी करणाऱ्या रशियाच्या शस्त्रधारी गटांशी चर्चा केलेली आहे. मात्र हे गट सार्वजनिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असून, त्यामुळे पूर्व युक्रेनमधील नागरिकांना त्रास होत आहे. ही परिस्थिती शांततेत सोडविण्यासाठी युक्रेनचे सरकार सातत्याने चर्चेचा मार्ग अवलंबत आहे. मात्र त्याला यश येत नसल्याने या शस्त्रधारी गटांवर कारवाई केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने कार्ने यांनी सांगितले.
‘‘युक्रेनच्या सरकारने प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकावे. मात्र रशियाच्या शस्त्रधारी गटांवर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा उपाय नसेल, तर या कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा आहे. युक्रेनमध्ये घटनात्मक सुधारणा करण्यास, निवडणूक यंत्रणा निर्माण करण्यास आणि सत्तेचे विक्रेंद्रीकरण करण्यास अमेरिकेचा पाठिंबा असेल,’’ असे कान्रे यांनी सांगितले.