अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची घोषणा

मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा कट आखून तो तडीस नेणारे तसेच त्यात मदत करणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यास ५० लाख डॉलर्सचे (३५ कोटी रुपये) इनाम अमेरिकेने जाहीर केले आहे. मुंबई हल्ल्याच्या दशकपूर्ती निमित्ताने अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने या हल्ल्याच्या कटाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ३५ कोटी रुपयांचे हे इनाम जाहीर केले. या हल्ल्यात दहा पाकिस्तानी दहशतवादी प्रत्यक्ष सामील होते, त्यांनी सहा अमेरिकी व्यक्तींसह १६६ जणांना ठार केले होते.

अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूर येथे पंधरा दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी मुंबई हल्ल्याचा मुद्दा उपस्थित  केला होता व दहा वर्षे उलटूनही या हल्ल्यातील आरोपींना पकडून शिक्षा करण्यात आलेली नाही, अशी खंत व्यक्त केली होती. परराष्ट्र खात्याच्या ‘न्यायासाठी इनाम’ या कार्यक्रमात सोमवारी हे इनाम जाहीर केले असून त्यात मुंबई हल्ल्याच्या कटात सामील असणारे व इतर कुठल्याही अर्थाने त्याच्याशी संबंधित असणारे यांच्याबाबत माहिती देणाऱ्यांना ५० लाख डॉलर्स दिले जाणार आहेत.

२६ ते २९ नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईत हल्ला झाला त्यात दहा दहशतवादी सामील होते, हा हल्ला लष्कर-ए-तोयबाने घडवून आणला होता. अमेरिकेने या हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने या हल्ल्यातील दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत.  मुंबई हल्ल्याविषयी माहितीसाठी आता हे इनाम अमेरिकेने जाहीर केले असून एप्रिल २०१२ मध्ये परराष्ट्र खात्याने लष्कर-ए- तोयबाचा संस्थापक हाफिज महंमद सईद, हाफिज अब्दुल रहमान मक्की व इतरांना पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते. परराष्ट्र खात्यानेच लष्कर-ए-तोयबा या संघटनेला परदेशी  दहशतवादी संघटना घोषित केले होते. मे २००५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ र्निबध समितीने लष्कर-ए- तोयबाचे नाव र्निबध यादीत समाविष्ट केले होते.

मुंबई हल्ल्यातील मृतांना राजनाथ सिंह यांची श्रद्धांजली

मुंबईतील २००८ मधील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली, या हल्ल्यात आप्तेष्ट गमावलेल्या कुटुंबीयांच्या वेदना मी समजू शकतो असे ते यावेळी म्हणाले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास दहा वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांशी प्राणपणाने लढणाऱ्या जवानांच्या धैर्य व  शौर्याचे कौतुक केले. राजनाथ सिंह म्हणाले की, मुंबईतील हल्ल्यास १० वर्षे पूर्ण झाली असून  या हल्ल्याच्या वेदना अजूनही कायम आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यात दहा दहशतवादी पाकिस्तानातून भारतात आले व त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार केला होता. त्यात १६६ जण ठार झाले त्यात १८ सुरक्षा जवानांचा समावेश होता. यात कोटय़वधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

  • माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक व ईमेल (info@rewardsforjustice.net)
  • फोन (८००-८७७-३९२७- उत्तर अमेरिका), फोन (२०५२०-०३०३ वॉशिंग्टन अमेरिका) कुणाला मुंबई हल्ल्याबाबत माहिती असेल तर अमेरिकी दूतावास अधिकाऱ्यांनाही ते सांगू शकतात. संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.