अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय महत्वाची भूमिका बजावणार आहेत. अमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार मोठ्या संख्ये आहेत. त्यामुळेच भारतीयांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही मोठ्या पक्षांनी प्रयत्न सुरु केलेत. याचा प्रत्यय सध्या निवडणुकींच्या बॅलेटकडे पाहिल्यावर येत आहे. अनेक भारतीय भाषांना बॅलेट मतदानपद्धतीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे.

मिलन वैष्णव यांनी बॅलेट बॉक्सचा फोटो शेअर केला असून यामध्ये इंग्रजीबरोबरच हिंदी, तेलगु, गुजरातीसहीत एकूण पाच वेगवेगळ्या भाषा दिसत आहेत. दुसऱ्या एक ट्विटमध्ये हा फोटो कॅलिफोर्नियामध्ये काढण्यात आल्याचं मिलन यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या एका युझरने सॅण्टा क्लॅरा कंट्रीमध्ये मतदारांना ईमेलच्या माध्यमातून मत देताना सहा भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये तामिळ, तेलगु, पंजाबी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषांचा समावेश आहे.

अमेरिकेमध्ये २०१८ साली सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडीजने केलेल्या अभ्यासामध्ये तेलगु ही अमेरिकेमध्ये सर्वात वेगाने वाढणारी भाषा असल्याचे म्हटलं आहे. “२०१७ साली चार लाख लोकं ही भाषा बोलतात. २०१० ते २०१७ मध्ये तेलगु बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक वेगाने वाढले आहे. हे प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत आहे,” असं या अभ्यास म्हटलं होतं.

अमेरिकेतील चार लाख १५ हजार ४१४ लोक घरी तेलगुमध्ये संवाद साधतात. तर हिंदीमध्ये बोलणाऱ्यांची संख्या आठ लाख ६३ हजार ७७, गुजरातीत बोलणाऱ्यांची चार लाख ३४ हजार २६४ आणि उर्दू बोलणाऱ्यांची पाच लाख सात हजार ३२९ आहे, असं या अहवालात म्हटलं होतं. अमेरिकेमध्ये माहिती तंत्रज्ञान श्रेत्रात काम करणारे अनेक तरुण हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधून येतात त्यामुळे तेलगु बोलणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांनाही अमेरिक भारतीय समाजाला आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीने १४ भारतीय भाषांमध्ये आपल्या डिजीटल जाहिराती प्रकाशित केल्यात. ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार २० लाख अमेरिकन भारतीय या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत.