उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व अधिकाऱ्यांना सकाळी ९ वाजता आपल्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यासोबत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तात्काळपणे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितलं असून, नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधक राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन योगी आदित्यनाथ सरकारला टार्गेट करत आहेत. याच पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होी. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक आदेश जारी केला आहे. यानुसार, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिक्षकांना सकाळी ९ वाजता आपल्या कार्यालयात पोहोचण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाची तात्काळपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

याआधी योगी आदित्यनाथ यांनी बैठकीदरम्यान भ्रष्ट आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्याचा आदेश दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अशा २० हून अधिक अधिकाऱ्यांची यादी काढण्यात आली आहे.