News Flash

योगी आदित्यनाथ यांच्याकडून हिंदूंसंबंधी प्रश्नांना प्राधान्य

‘इंडियास्पेंड’च्या अभ्यासातील माहिती

योगी आदित्यनाथ

इंडियास्पेंडच्या अभ्यासातील माहिती

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Yogi Adityanath यांनी गेल्या आठ वर्षांत खासदार म्हणून संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा अभ्यास करता असे दिसून आले की, त्यांनी हिंदूंसंबंधी प्रश्नांना वाचा फोडण्यास प्राधान्य दिले आहे.

योगी यांच्या CM मुख्यमंत्रिपदी निवडीनंतर ते कट्टर हिंदुत्ववादी असल्याची टीका अनेक स्तरांतून होऊ लागली. त्यावर केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी १९ मार्च रोजी फेसबुकवरून म्हटले, की काही विरोधक योगी यांची प्रतिमा दंगलखोर अशी करत आहेत हे दुर्दैवी आहे. या लोकांनी योगी यांनी संसदेत चर्चेवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घ्यावी. त्यातून त्यांच्या प्रगल्भ विचारसरणीची झलक दिसते. त्यानंतर इंडियास्पेंड आणि फॅक्टचेकरने पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या साह्य़ाने योगी यांनी गेल्या आठ वर्षांत संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला. त्यातून पुढील बाबी स्पष्ट झाल्या.

या काळात योगी यांनी नद्यांचे प्रदूषण, एन्सिफॅलायटिस रोगाचा वाढता प्रसार, रेल्वे व शिक्षणासंबंधी प्रश्न लोकसभेत विचारले असले तरी गेल्या तीन वर्षांत प्रामुख्याने हिंदूंच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. त्यात समान नागरी कायदा, गोहत्या, हिंदू यात्रेकरूंचे रक्षण, शत्रूच्या मालमत्तेसंबंधी कायद्याच्या आडून भारतात पाकिस्तानींना प्रवेश देणे, इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेत भारतीय युवकांचा सहभाग, देशाच्या अनेक भागांत हिंदूंपेक्षा वेगाने वाढणारी मुस्लिमांची लोकसंख्या आणि त्याने देशाच्या अंतर्गत सुरक्षेला निर्माण होणारा धोका असे विषय त्यांनी लोकसभेत प्रामुख्याने उपस्थित केले. सोळाव्या म्हणजे सध्याच्या सभागृहात योगी यांनी उपस्थित केलेल्या एकूण प्रश्नांमध्ये या विषयांचा वाटा १८ टक्के होता. म्हणजेच गेल्या (१५व्या) लोकसभेच्या तुलनेत योगी यांच्या या विषयांवरील प्रश्न विचारण्यात सात टक्क्य़ांनी वाढ झाली होती.

योगी यांनी विचारलेले प्रश्न प्रामुख्याने परराष्ट्र, आरोग्य, गृह आणि मनुष्यबळ विकास या चार मंत्रालयांशी संबंधित होते. १५ व्या व १६ व्या लोकसभेच्या कार्यकालात योगी यांनी अन्य खासदारांच्या तुलनेत अधिक प्रश्न विचारले. योगींनी फेब्रुवारी २०१४ पर्यंत ३४७ प्रश्न विचारले. या काळात खासदारांनी सरासरी ३०० प्रश्न विचारले होते. मार्च २०१७ पर्यंत योगींनी २८४ प्रश्न विचारले. त्या तुलनेत खासदारांची प्रश्न विचारण्याची सरासरी १८० इतकी होती.

१५व्या लोकसभेत (जून २००९ ते फेब्रुवारी २०१४) योगी यांची संसदेतील उपस्थिती ७२ टक्के होती. या काळात उत्तर प्रदेशच्या खासदारांची सरासरी उपस्थिती ७९ टक्के व देशातील खासदारांची सरासरी उपस्थिती ७६ टक्के होती. मात्र योगी यांचे चर्चेत भाग घेण्याचे प्रमाण इतरांपेक्षा अधिक होते. योगी यांनी ८२ वेळा चर्चेत भाग घेतला. तर अन्य खासदारांची याबाबतची सरासरी ३८ इतकी होती.     (स्रोत-इंडियास्पेंड.ऑर्ग)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 12:10 am

Web Title: uttar pradesh cm yogi adityanath hinduism
Next Stories
1 ‘वाघ-सिंह मांस नाही खाणार तर काय पालक पनीर खातील का?’
2 एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारणाऱ्या खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात ‘एफआयआर’
3 अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या महिलेची आणि मुलाची राहत्या घरात हत्या
Just Now!
X