उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. रावत यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. विशेष म्हणजे रविवारी नैनिताल जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला रावत यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

नक्की वाचा >> मदत म्हणून जास्त धान्य हवं होतं तर जास्त मुलं जन्माला घालायला हवी होती; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

“माझ्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती व्यवस्थित असून मला कसलाही त्रास होत नाहीय. मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी लोकं माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया काळजी घ्यावी आणि स्वत:ची चाचणी करुन घ्यावी,” असं ट्विट रावत यांनी केलं आहे.

कालच हे अन्य एका कार्यक्रमामध्येही सहभागी झाले होते.होळीनिमित्त आयोजित कार्यक्रामध्ये त्यांनी हजेरी लावल्याचे फोटो ट्विट केले होते.

रविवारी झालेल्या कार्यक्रमामध्येही रावत यांनी दोन वादग्रस्त वक्तव्य केली होती. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना, अमेरिकेने भारतावर २०० वर्ष राज्य केल्याचं म्हटलं होतं. करोना कालावधीमध्ये भारतामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर काय झालं असतं कोणीही सांगू शकत नाही. मात्र आपली परिस्थिती आतापेक्षा वाईट असती. पंतप्रधान मोदींनी आपल्याला खूप दिलासा देणारे निर्णय घेतले, अशा शब्दांमध्ये तीरथ सिंह रावत यांनी मोदींचे गुणगाण गायले. पुढे बोलताना, “इतर देशांपेक्षा भारत करोना परिस्थिती अगदी छान पद्धतीने हाताळत आहेत. अमेरिका ज्यांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केलं, ज्यांनी जगावरराज्य केलं ते या करोनाचा सामना करताना डळमळत आहेत. अमेरिकेमध्ये ३.७५ लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या इटलीमध्ये करोनामुळे ५० लाख जणांचा जीव गेला असून लवकरच तिथे नव्याने लॉकडाउन लागू होणार आहे,” असंही रावत म्हणाले.

याशिवाय रावत यांनी याच भाषणादरम्यान, करोना कालावधीमध्ये सरकारकडून देण्यात आलेल्या अन्नधान्याच्या मदतीसंदर्भात भाष्य करताना ज्या कुटुंबामध्ये व्यक्तींची संख्या जास्त आहे त्यांना सरकारकडून कमी मदत राशन मिळालं, असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी ज्यांनी २० जन्माला घातली त्यांना अधिक मदत मिळाली यामध्ये त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवून काही होणार नाही. तुम्ही जास्त मुलं जान्माला घातली नाही हा तुमचा दोष आहे, अशा पद्धतीचं वक्तव्यही केलं.

नक्की वाचा >> “CM साहेब, जीन्स नाही तुमचा मेंदू फाटलाय”; महिला नेत्या तीरथ सिंह रावतांवर संतापल्या

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून आपल्या वादग्रस्त व्यक्तांमुळे तीरथ सिंह रावत सतत चर्चेत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एका ठिकाणी भाषण देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यात भगवान श्री राम आणि श्री कृष्णाप्रमाणे पुजा केली जाईल, असं वक्तव्य केलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी फाटक्या जीन्स (रिप्ट जीन्स) घालणाऱ्या महिलांच्या संस्कारासंदर्भात वक्तव्य केलं होतं. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.