तामिळनाडूमध्ये ओ. पनीरसेल्वम आणि व्ही. एस. शशीकला यांच्यामध्ये सत्तेसाठी जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. शशीकला यांनी जयललिता यांचा विश्वासघात केला होता असा आरोप पनीरसेल्वम यांनी केला आहे. शशीकला या सत्तेसाठी कट कारस्थाने रचत आहेत. जर त्यांना सत्ता मिळाली तर ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना ठरेल असे पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. जेव्हा जयललिता रुग्णालयात होत्या तेव्हा २४ व्या दिवशी शशीकला यांच्याशी आपण प्रथम बोललो असल्याचे त्यांनी म्हटले.

त्या आधी त्यांचा कधी संबंध देखील आला नाही असा खुलासा पनीरसेल्वम यांनी केला आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे नेते मधूसुदन यांच्यावर देखील दबाव टाकण्यात आल्याचे पनीरसेल्वम यांनी म्हटले. अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. शशीकला यांच्या गटाला उत्तर देण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे असे ते म्हणाले. शशीकला यांच्या गटाने प्रत्येक आरोप आम्ही फेटाळून लावू शकतो असे देखील ते म्हणाले. ओ. पनीरसेल्वम आणि शशीकला हे दोघे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता पनीरसेल्वम आणि राव यांची भेट होईल तर संध्याकाळी ७ वाजता शशीकला आणि राव यांची भेट होणार आहे.

दोन्ही गटातील समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा पवित्रा घेतला आहे. अण्णा द्रमुकच्या १३४ आमदारांपैकी आपल्याला १३१ जणांचे समर्थन आहे असे शशिकला यांनी म्हटले आहे. पनीरसेल्वम यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. अण्णा द्रमुकमध्ये पडलेल्या गटबाजीमुळे केवळ विरोधक खुश असल्याचे दिसत आहे असे त्या म्हणाल्या. द्रविड मुन्नेत्र कळगम (डीएमके) या पक्षाचे नेते एम. के. स्टालिन हे या फुटीमुळे खुश आहेत असे त्या म्हणाल्या.

पनीरसेल्वम यांना डीएमकेनीच पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांनी केला. अण्णा द्रमुकचे खासदार व्ही. मैत्रेयन यांनी देखील पनीरसेल्वम यांची बाजू घेतली आहे.  तामिळनाडूमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला असून काही वेळातच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे चेन्नईत आगमन होणार आहे. राव हे हे दोघांचीही बाजू ऐकून घेतील आणि त्यानंतर निर्णय घेतील. दरम्यान, शशिकला यांच्याविरोधात अघोषित उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असण्याचा खटला सुरू आहे.