गेल्या २४ तासांत देशात ३६.७ लाख लोकांना कोविड १९ प्रतिबंधक लस देण्यात आली असून आतापर्यंत एका दिवसात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. आतापर्यंत गेल्या २४ तासात ३६ लाख ७१ हजार २४२ जणांना लस देण्यात आली असून त्यातील ३३ लाख ६५ हजार ५९७ जणांना पहिली मात्रा दिली आहे. त्यासाठी ५१२१५ लसीकरण सत्रे घेण्यात आली.  ३ लाख ५ हजार ६४५ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एका दिवसातील लसीकरणाचा हा उच्चांक आहे. ६.८७ कोटी म्हणजे ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ लोकांना लस देण्यात आली आहे, त्यासाठी ११,३७,४५६ सत्रे घेण्यात आली.

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या मात्रेच्या चाचण्यांना परवानगी

भारत बायोटेक या हैदराबादेतील कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लशीच्या तिसऱ्या मात्रेसाठी (बुस्टर डोस) चाचण्यांना भारताच्या महा औषधनियंत्रकांनी मान्यता दिली आहे. या लशीच्या तीन टप्प्यातील चाचण्या  पूर्ण होण्यापूर्वीच तिच्या वापरास आपत्कालीन मंजुरी  देण्यात आली होती.

भारत बायोटेकने महा औषधनियंत्रकांच्या निवड समितीपुढे काही सुधारणा मांडल्या असून त्यानंतर विहित प्रक्रियेनुसार तिसऱ्या मात्रेतील चाचण्यांना मंजुरी देण्यात आली. कंपनीने दुसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या प्रक्रियेत काही सुधारणा सुचवल्या असून दुसऱ्या मात्रेनंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस देण्याची सूचना यात मांडली आहे. समितीने  शिफारस केली आहे,की बुस्टर डोस  केवळ सहा मायक्रोग्रॅमचा असावा. तिसऱ्या मात्रेनंतर किमान सहा महिने तरी बुस्टर डोस दिलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. भारत बायोटेककडे प्राथमिक व दुय्यम उद्दिष्टांचे सविस्तर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. लोकांवर या लशीच्या पुरेशा प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे. त्यानुसार भारत बायोटेक कंपनीने सुधारित वैद्यकीय चाचण्या प्रक्रिया पद्धती योग्य प्रकारे तयार करावी असेही सुचवण्यात आले आहे. बैठकीत भारत बायोटेकच्या वतीने तिसऱ्या मात्रेच्या टप्प्यातील चाचण्यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील सादर केला. बऱ्याच चर्चेअंती समितीने ४५ वयोगटावरील व्यक्तींना लस देऊन चाचण्या करण्यास सांगितले. हा डोस मोफत देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ब्राझीलमध्येही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात येणार आहे. लशीची परिणामकारकता तपासण्यासाठी किमान काही संख्येने व्यक्तींवर चाचण्या करणे गरजेचे आहे.