आपल्या अदांनी सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश आता वाहतुकीचे नियम पाळा असे सांगतेय. त्यासाठी ती चक्क पुन्हा एकदा डोळाही मारते आहे! ऐकून आश्चर्य वाटले ना? पण ही नामी शक्कल लढवली आहे ती वडोदरा पोलिसांनी. वडोदरा पोलिसांनी प्रिया प्रकाशचे डोळा मारणारे पोस्टर लावले आहे. या पोस्टरमधून प्रिया प्रकाश वारियर हाच संदेश देते आहे की चारचाकी, दुचाकी चालवताना जरासा कानाडोळा कराल तर तुमचा अपघात होईल. या आशयाचे पोस्टर लावल्याने या पोस्टरची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

हल्ली सगळेच लोक टेक्नोसॅव्ही झाले आहेत. स्मार्ट फोन प्रत्येकाकडे असणे ही देखील अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे. अशात प्रिया प्रकाशचा तो डोळा मारणारा व्हिडिओ चांगलाच फेमस झाला होता. या व्हिडिओमुळे एका रात्रीत प्रिया प्रकाश प्रसिद्ध झाली. तिच्या या प्रसिद्धीचा उपयोग सामाजिक उपक्रमासाठी करण्याचे वडोदरा पोलिसांनी ठरवले. त्याच अनुषंगाने पोलिसांनी एक पोस्टर तयार केले ज्यावर प्रिया प्रकाशचा डोळा मारणारा फोटो छापण्यात आला आणि दुर्लक्ष कराल तर अपघात घडेल अशा आशयाची कॅचलाइनही या पोस्टरखाली लिहिण्यात आली. हे पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साइटवर या पोस्टरची चर्चा रंगली आहे.

लोकांना दैनंदिन आयुष्यात समोर येणारे उदाहरण देऊन जर समजावून सांगितले तर त्यांना ती गोष्ट पटकन लक्षात येते असे मानले जाते. त्याचमुळे प्रिया प्रकाशच्या फोटोचा वापर करून वाहतूक नियम पाळण्याचा संदेश द्यायचा हे नक्की झाले. वडोदरा पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलने हे पोस्टर ट्विट केले आहे.