अनंत गोएंका

‘‘भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट  शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय अशा गोष्टी आपण घडवू शकतो’’, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केले.

करोना साथीने मानव जातीला किती हादरा दिला, असे विचारले असता ते म्हणाले, की करोना साथ हा मोठा धक्काच होता. त्याचा मूल्यमापनात्मक स्पष्ट परिणाम अजून समजलेला नाही, पण मानसिक आरोग्याचे, शैक्षणिक व आर्थिक नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. येत्या दोन ते पाच वर्षांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे आताची हानी ही कायमची आहे अशी निराशा बाळगण्याचे कारण नाही.

पुढील दोन ते पाच वर्षांत पुन्हा करोनासारखी महासाथ येण्याची शक्यता वर्षांत २ टक्के आहे. त्यामुळे अजून दहा वर्षे तरी अशी साथ पुन्हा येणार नाही.  औषधे व लशी येत आहेत, त्यामुळे यापुढील काळात दुर्दैवाने अशी साथ आली तरी ती किरकोळ असेल कारण आपली सज्जता मोठी असणार आहे. आताच्या साथीतही आपण ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांनी किती तत्परतेने या साथीला प्रतिसाद दिला हे पाहिले आहे. त्यामुळे त्या देशांना कमी फटका बसला. आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा कारण त्यात असमानता आहे.

करोना साथीतून आपण नेमका काय धडा घेणार, या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले, की यातून पुढील काळात येणाऱ्या प्रश्नांची व्याप्ती आधीच लक्षात आली. आपल्याकडे प्रतिकूल हवामान घटना बऱ्याच प्रमाणात दिसून आल्या. युरोपीय समुदाय व इतर देशांनी त्याबाबत कार्यक्रमही हाती घेतले आहेत. करोना हवामानाशी निगडित आहे हे अजून स्पष्ट नसले तरी हवामानाच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष झालेले नाही, पण त्यावर नियोजन नाही. आता याकडे जास्त गांभीर्याने पाहिले जाईल.

सीरमशी असलेल्या संबंधाबाबत त्यांनी सांगितले, की जगात एकूण १५० लशी तयार होत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. या लशी सुरक्षित व प्रभावी दोन्ही असाव्या लागतात व त्या कमी खर्चात तयार करता येतात हे सीरमने दाखवून दिले आहे. फायझर व मॉडर्ना या लशी महाग आहेत, त्या एमआरएनए लशी आहेत. त्यामुळे त्या गरीब देशांना  वापरण्यास प्रोत्साहन देणे अवघड आहे. फायझरने लशीच्या ४० दशलक्ष मात्रा देण्याचे मान्य केले अजून २ अब्ज मात्रांची गरज आहे. आता आमचे लक्ष अ‍ॅस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन, नोव्हाव्हॅक्स यांच्यावर आहे. भारतातील करोनाबाबत..

भारतात आता करोना कमी होत आहे, पण अमेरिका, युरोप  व ब्रिटनमध्ये तो अजूनही वाढतच आहे याबाबत तुमचे मत काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की जे तरुण लोक अगदी घराबाहेर राहिले त्यांना या विषाणूने मोठा फटका दिला नाही ही चांगली बातमी आहे. धोका आहे पण कमी आहे. भारतासारख्या देशात नेमके हेच घडून मृत्युदर कमी राहिला आहे.

पूर्वेकडची व पाश्चिमात्य दानशूरता यातील फरकाबाबत विचारले असता गेट्स म्हणाले, की यात खूप फरक आहे. पिढीजात श्रीमंत लोक मदत देतात, नाही असे नाही; पण जर नवीन पिढीतील कुणी चांगली संपत्ती मिळवली असेल तर ते लोक लगेच दानासाठी रक्कम देण्यास तयार असतात. ते ही संपत्ती नशिबाचा भाग मानतात व त्यातून समाजाला देणे देतात. मार्क झकरबर्गने त्यासाठीच ९९ टक्के संपत्ती दान केली. मीही ९५ टक्के संपत्ती दान करण्याची योजना आखत आहे. आपण आपल्या भावी पिढय़ांबाबतसुद्धा असेच औदार्य दाखवले पाहिजे.

 महिलावर्गाला फटका

मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वार्षिक पत्रात असमानतेबाबत विचार केला आहे.  गेट्स म्हणाले, की गरीब देशांतील महिलांची स्थिती पुरुषांपेक्षा वाईट आहे. आर्थिक विकास हा त्यावरचा उपाय आहे.  करोनाचा फटका महिलांना अधिक बसला. अगदी श्रीमंत देशातही त्यांना घरकाम व मुलांचे संगोपन करावे लागले. ऑनलाईन शिक्षणात त्याच मुलांबरोबर असतात. त्यामुळेच लिंगभाव समानतेला मेलिंडाने या अहवालात अधोरेखित केले आहे.

त्यांनी सांगितले, की ऑनलाईन शिक्षणात गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी इंटरनेट , संगणक लागतो.  आशय तयार करणारे शिक्षक लागतात. ऑनलाईन पद्धतीने शिक्षणात करोनानंतर मोठी प्रगती दिसली. शिक्षण सुधारले तर अर्थव्यवस्था सुधारेल. कुशल मनुष्यबळ हा कुठल्याही देशाचा कणा असतो. त्यातूनच प्रगती शक्य असते.

गमावलेली संधी, खेद आणि खंत..

तुमच्या आयुष्यातील गमावलेली संधी कोणती, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की मायक्रोसॉफ्टला फोन संचालन प्रणाली तयार करता आली नाही याची खंत मला वाटते. काही चुका मीही केल्या त्याचा खेद वाटतो. इंटरनेटमध्ये बदल करायचे झाल्यास ते व्यक्तीची ओळख व सुरक्षा या दोन मुद्दय़ांवर करावे लागतील. पण ते तितके सोपे नाही.

भारतापासून काय शिकलात?

भारतापासून काय शिकायला मिळाले, या प्रश्नावर ते म्हणाले, की भारतात मोठी ताकद आहे. अनेक बुद्धिमान लोक या देशात आहेत. तुम्हाला येथे तेल, खनिजे दिसणार नाहीत पण माणसे दिसतील. संमिश्र माणसे असल्याने हे वेगळेच रसायन आहे. त्यांना चांगले शिक्षण दिले तर त्यांच्यात अविश्वसनीय ताकद आहे यात शंका नाही.