मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व आपल्या सततच्या वादग्रस्त विधानांनी परिचीत असेलेले काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल एक खळबळजनक विधान केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपाने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी महात्मा गांधीजींच्या हत्येचा कटात सावरकारांचे नाव होते, असे वादग्रस्त विधान केले आहे.

“सावरकर यांच्या जीवनाचे दोन पैलू होते. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात ते सहभागी झाले आणि इंग्रजांची माफी मागून परत आले होते. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटातही त्यांचे नाव आले होते.” असे खळबळजनक विधान दिग्विजय सिंह यांनी माध्यमांसमोर केले आहे.

आणखी वाचा : “फक्त सावरकर कशाला नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या”, ओवेसींचा भाजपाला टोला

झाबुआ मतदरासंघातील उमेदवार कांतिलाल भूरिया यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते अलिराजपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर, या अगोदर काँग्रेसचे प्रवक्ते आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवाही यांनी देखील सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या मागणीवर निशाणा साधला होता. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेलाही हा सन्मान देण्याची मागणी का नाही करत? असा सवाल त्यांनी केला. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षी भाजपच्या नेतृत्वाने यावर गंभीरपणे विचार करायला हवा, असेही ते म्हणाले होते