उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटल्याने उत्तर प्रदेशात गंगा नदीकिनारी असलेल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशी मठ येथे हिमनदी फुटल्याने जलविद्युत प्रकल्प वाहून गेला असून दीडशे कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धौली गंगा नदीचे पाणी वेगाने वाहत आल्याने ही दुर्घटना झाली असून त्यामुळे नदी किनारी असलेल्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. यात मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. ऋषी गंगा ऊर्जा प्रकल्पात काम करणारे दीडशे मजूर यात मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात आली. हा जलविद्युत प्रकल्प हिमनदी फुटल्याने वाहून गेला, अशी माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या उपमहानिरीक्षक रिधीम अगरवाल यांनी दिली.

दरम्यान, उत्तर प्रदेशात सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रविवारी सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून पुनर्वसन आयुक्तांनी सांगितले, की उत्तरांखडमध्ये नंदादेवी हिमनदी फुटल्याचे वृत्त हाती आले असून गंगेकाठी असलेल्या सर्व गावांतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २४ तास पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पीएसी पूरनियंत्रक दले यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले, की  या आपत्तीत उत्तराखंडला आम्ही मदत करू.

उत्तराखंडमधील  नैसर्गिक दुर्घटना

  •  १९९१- उत्तराखंड भूकंप- त्या वेळी उत्तराखंड हा उत्तर प्रदेशचा भाग होता. ऑक्टोबर १९९१ मध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला असता ७६८ जण ठार झाले होते तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली.
  • १९९८- माल्पा भूस्खलन- पिठोरगड जिल्ह्यात माल्पा येथे भूस्खलन झाले. त्यात २५५ लोक गाडले गेले. त्यात कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या ५५ यात्रेकरूंचा समावेश होता. त्या वेळी जो ढिगारा तयार झाला त्याने शारदा नदीचे पाणी रोखले गेले.
  •  १९९९- चमोली भूकंप- चमोली जिल्ह्यात ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात शंभरहून अधिक लोक मरण पावले. शेजारच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोठी  हानी झाली. अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले. पाण्याचे प्रवाह बदलले. रस्त्यांवर भेगा गेल्याचे दिसून आले.
  •  २०१३- उत्तर भारतातील पूर (केदारनाथ दुर्घटना)  – जून २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन पूर आले व भूस्खलनही झाले. त्या वेळी ५७०० लोक मरण पावल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. अनेक पूल व रस्ते त्यात वाहून गेले. किमान तीन लाख लोक उत्तराखंड व  परिसरात अडकून पडले होते. चारधाम यात्रेला आलेल्यांचा त्यात समावेश होता. सर्वांत मोठी हानी केदारनाथ येथे झाली होती.