राष्ट्रीय बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये फरार झालेला विजय मल्ल्या याला भारतात आणण्याची तयारी सुरू केली आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना सोमवारी लंडनकडे रवाना झाले. त्यांच्यासमवेत ईडीचेही अधिकारी होते. फरार घोषित केलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विजय मल्ल्या याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला सशर्त जामीन देण्यात आला होता. मल्ल्या याला भारताच्या म्हणण्यानुसार स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी करार झाला होता. विजय मल्ल्याला भारतात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसमोर मोठे आव्हान आहे. लंडनमधून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी भारताने कुटनीतीचाही वापर केला होता. आता हे प्रकरण तेथील न्यायालयात आहे. मल्ल्याच्या अटकेनंतर लंडनमधील न्यायालयात त्याच्या प्रत्यार्पणासंबंधीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच प्रकरणात भारतातून सीबीआय आणि ईडीचे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान मल्ल्या आपल्या प्रत्यार्पणाला आव्हान देऊ शकतो. मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा मल्ल्या करू शकतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. विजय मल्ल्याच्या प्रकरणावर येत्या १७ मे रोजी येथील न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायाधीश दोन्ही पक्षकारांना पुरावे सादर करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्यावर १७ राष्ट्रीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कर्जाची परतफेड न केल्याने भारताने मल्ल्याला फरार घोषित केले आहे. २०१६ पासून मल्ल्या लंडनमध्ये राहत आहे.