बिरभूम : एनपीआर-एनआरसीबाबतच्या भीतीचा पहिला विपरीत परिणाम पश्चिम बंगालमध्ये दिसून आला असून, गूगलने राज्यातील त्यांचा ‘इंटरनेट साथी’ कार्यक्रम थांबवला आहे.
काही महिला राष्ट्रीय नागरिक नोंदणीसाठी (एनआरसी) माहिती गोळा करत असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून गावकऱ्यांनी १० जानेवारीपासून तरुण महिलांच्या कुटुंबीयांची घरे उद्ध्वस्त करण्याच्या आणि जाळण्याच्याही अनेक घटना घडल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या तरुण महिला मासिक सुमारे १२०० ते १५०० रुपये मिळवणाऱ्या ‘इंटरनेट साथी’ होत्या आणि गूगलने टाटा ट्रस्टच्या भागीदारीत जून २०१५ मध्ये सुरू केलेल्या देशव्यापी मोहिमेचा भाग होत्या. ग्रामीण भागातील महिलांना दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर कसा करावा हे शिकवून त्यांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा ३ कोटींहून अधिक महिलांना फायदा झाल्याचा गूगलचा दावा आहे.
कोलकातापासून सुमारे २३० किलोमीटरवर असलेल्या बिरभूत जिल्ह्य़ातील कनाची खेडय़ात सहाशे लोकांच्या जमावाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत असलेल्या सैनी सुलताना (२६) या ‘इंटरनेट साथी’च्या घरावर हल्ला केला. येथून १० किलोमीटरवर असलेल्या मारगाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबा खेडय़ातील रिम्पा खातून (१८) हिच्याही घरावर हल्ला करण्यात आल्यामुळे ती बोलण्याच्या स्थितीत नाही.
ब्रिटनमधील निदर्शनांबाबत भारताचा आक्षेप
नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर २६ जानेवारी रोजी भारतविरोधी निदर्शने करण्याची परवानगी दिल्याबद्दल भारत सरकारने ब्रिटनवर टीका केली आहे. अशा प्रकारांमुळे दूतावासाच्या कारभारात समस्या येत असल्याचे भारताने म्हटले आहे.