गोरक्षेचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात चांगलाच गाजतो आहे. आज साबरमतीमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या मुद्यावर भाष्य केले. गोरक्षेच्या नावाखाली जी हिंसा होते त्याचे मला अतीव दु:ख होते आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गोरक्षेसाठी सगळ्यात मोठे योगदान विनोबा भावे आणि महात्मा गांधी या दोन नेत्यांनी दिले आहे.

गायीची महती काय असते हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लहानपणीचा किस्सा सांगितला, ”एका कुटुंबासमोर एक गाय रोज येऊन भाकरी-पोळी खात असे. एकेदिवशी ती गाय धावत येत होती. त्या कुटुंबातल्या मुलगा तिच्या पायाखाली आला आणि चिरडला गेला. त्यानंतर गायीने आठ ते दहा दिवस त्या कुटुंबासमोर येऊन अश्रू ढाळले… अन्न आणि पाणी घेतले नाही, पश्चात्ताप म्हणून आपला प्राणत्याग केला. ” यावरूनच गाय किती महत्त्वाची असते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

इतकेच नाही तर देशात गायीच्या नावाखाली हिंसाचार केला जातो, एखाद्या रूग्णालयात रूग्ण दगावला तर त्याचे संतापलेले नातेवाईक रूग्णालय जाळतात. ही सगळी परिस्थिती क्लेशदायक आहे. ज्या देशात मुंग्यांना अन्न देणे पुण्य समजले जाते, भटक्या कुत्र्यांना खायला घालणे ही इथली भूतदया आहे त्या देशाला काय झाले आहे? या देशातले लोक एवढे हिंसक का होत आहेत? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे.

गायीचे रक्षण करण्यासाठी लोक पुढे येतात आणि माणसांची हत्या करतात. हिंसाचार माजवतात, गोरक्षणाची ही कोणती पद्धत आहे? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमाचा दौराही केला. तसेच याठिकाणी येऊन त्यांनी चरख्यावर सूतही कातले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहासाचाही दाखला दिला. आपला इतिहास आपण कधीही विसरायला नको. श्रीराजचंद्र हे कोण होते? हे आजच्या पिढीनेही जाणून घेतले पाहिजे. महात्मा गांधींच्या विचारांमुळे जी प्रेरणा मिळते, त्यातून आजही अहिंसेची प्रेरणा मिळते. चंपारण्य सत्याग्रहाचे शंभरावे वर्ष आपण साजरे करत आहोत. मात्र त्याचवेळी चंपारण्याचा इतिहासही लोकांनी समजून घेतला पाहिजे. इतिहासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. गोरक्षणाच्या मुद्द्यावर आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठे वक्तव्य केले आहे. गोरक्षा म्हणजे हिंसाचार माजवण्याचा एकाधिकार नाही. ही बाब अत्यंत गैर आहे, याचा निषेध करावा तितका थोडा आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.