सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला असून यामुळे सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या मेसेजमध्ये बँका २ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर असे सलग आठ दिवस बंद राहणार असल्याचं सागंण्यात आलं आहे. हा मेसेज मोठया प्रमाणात व्हायरल होत असून लोक एकमेकांना शुक्रवारीच बँकेचे व्यवहार पूर्ण करुन घ्या असं सांगत आहेत. मात्र हा मेसेज खोटा असून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.

२ सप्टेंबरला रविवार असल्याने बँका अशाही बंदच असणार आहेत. ३ सप्टेंबरला दहीहंडी असली तरी बँका सुरु असणार आहेत. त्यादिवशी फक्त सरकारी कार्यलायं बंद असणार आहेत. तसंच ४ सप्टेंबर मंगळवार आणि ५ सप्टेंबरला बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा संप असला तरी त्याचा परिणाम बँकांच्या कामकाजावर होणार नाही आहे. मुंबई शहर आणि राज्यातील सर्व बँका सुरु राहणार आहेत.

६ सप्टेंबरला गुरुवारी आणि ७ सप्टेंबरला शुक्रवारीही बँका नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. ८ सप्टेंबरला शनिवार आणि ९ सप्टेंबरला रविवार आहे, त्यामुळे बँकांना सुट्टी असल्याने त्या बंद राहणार आहेत. यामुळे तुमच्या मोबाइलवर आलेला सलग आठ दिवस बँका बंद असणारा मेसेज खोटा असून त्यात कोणतंही तथ्य नाही आहे. साप्ताहिक सुट्टी वगळता बँका नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.