विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

रणजीत बच्चन रविवारी सकाळी ६.३० वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. मित्रासमवेत ग्लोब पार्कमध्ये ते फिरण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी रणजीत बच्चन यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्यासोबत असलेले दोघे गंभीर जखमी झाले. तर डोक्यात गोळी लागल्यानं रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यु झाला.

गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले. माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजित पांडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि गुन्हे शाखा यांची सहा पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी रणजीत बच्चन यांचं पार्थिव ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं.

यापूर्वीही विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची हत्या –

रणजित बच्चन यांच्या हत्येची घटना घडली. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली होती. लखनौतील हिंडोला परिसरात त्यांच्या घरातच आरोपींनी तिवारी यांची आत्महत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटकही केलं. हे आरोपी सध्या तुरूंगात आहेत.