केरळमध्ये मंगळवारी एक धक्कादायक प्रकार घडला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या ताफ्यावर कन्नूर येथे काही तरुणांनी हल्ला केला. सीपीआय-एमच्या युथ विंगमधील तरुणांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डाव्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये डीव्हाएफआयच्या (डेमोक्रेटीक यूथ फेड्रेशन ऑफ इंडिया) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचे म्हटलं आहे.

केरळमधील गुरुवायूर मंदिरांबरोबर स्थानिक धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी गेलेल्या येडियुरप्पा यांच्या ताफ्यातील गाडीवर अचानक हल्ला करण्यात आला. हा हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवण्याऐवजी समोर आडव्या आलेल्या हल्लेखोरांना चुकवून गाडी वेगाने पळवली. चालकांच्या या कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्यामध्ये येणार असल्याची माहिती असूनही केरळ पोलिसांनी योग्यप्रकारे सुरक्षेची काळजी घेतली नाही, असा आरोप भाजपा समर्थकांकडून केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या जात असताना अचानक काही तरुण रस्त्यावर उतरतात आणि या ताफ्याकडे धावू लागतात असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ताफ्यामधील गाड्या हार्न वाजवत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र आंदोलक गाड्यांपुढे येत त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. इतकच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हे आंदोलक झेंड्याच्या काठ्यांनी हल्ला करतानाही दिसतात.

केरळ भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “सीपीआय एम च्या युथ विंगने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर असा भ्याड हल्ला केला. चालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या दौऱ्या आधीच हल्ल्यासंदर्भातील धमक्या देण्यात आल्यानंतरही केरळ पोलिसांनी योग्य काळजी घेतली नाही,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याआधीही केरळच्या दौऱ्यावर असणाऱ्या येडियुरप्पा यांच्या ताफ्याला पळ्यांगडी येथे युथ काँग्रेस आणि डीव्हाएफआयच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते.