|| संतोष प्रधान

काँग्रेससाठी सुरक्षित, जवळपास निम्मे अल्पसंख्याक मतदार, केरळात असला तरी तमिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेला लागून असल्यानेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी केरळातील मलबार प्रदेशातील वायनाड मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी दक्षिण भारतातून निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होती. पण राहुल गांधी यांनी केरळातील वायनाड मतदारसंघाची निवड केली आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवार एम. आय. शहनवास हे निवडून आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. २००९ मध्ये काँग्रेसचा उमेदवार दीड लाखांनी विजयी झाला होता. २०१४ मध्ये शहनवास यांचे मताधिक्य २० हजारांपर्यंत घटले होते. २००९ मध्ये भाजप उमेदवाराला ३.८५ टक्के मते मिळाली होती, तर २०१४च्या निवडणुकीत ती दुपटीने वाढली होती.

वायनाड जिल्ह्य़ात हिंदू लोकसंख्या ही ४९ टक्क्यांच्या आसपास आहे. हिंदू मतदारांमध्ये दलित मतदारांचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम २९ टक्के तर ख्रिश्चन २१ टक्क्यांच्या आसपास आहेत. मुस्लीम आणि ख्रिश्चन एकत्रित लोकसंख्या ही ५० टक्क्य़ांच्या आसपास आहे. तीन जिल्ह्य़ांच्या एकत्रित वायनाड मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या ५५ टक्क्यांच्या जवळपास आहे. या मतदारसंघात मुस्लीम लीगचा प्रभाव आहे. मुस्लीम लीग हा काँग्रेसप्रणीत आघाडीचा घटक पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन आणि मुस्लीम लीगची ताकद यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी तेवढे आव्हान नसेल. डाव्या आघाडीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे हा मतदारसंघ आहे.

वायनाड मतदारसंघात फक्त चार टक्क्य़ांच्या आसपास नागरीकरण झाले आहे. उर्वरित भाग ग्रामीण भागात मोडतो. शेतकरी वर्ग हा मोठा आहे. शेतकरी वर्गातील नाराजी उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी केरळाला बसलेल्या पुराच्या फटक्यानंतर शेतकरी आणि दुर्बल घटकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या विरोधात नाराजी आहे. याचाही राजकीय लाभ उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

लढत डाव्यांशी

काँग्रेस किंवा राहुल गांधी हे राष्ट्रीय पातळीवर भाजपशी दोन हात करीत आहेत. पण केरळातील वायनाड मतदारसंघात त्यांची लढत भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी होणार आहे. राहुल गांधी यांनी भाजपच्या विरोधात लढायला पाहिजे होते. या मतदारसंघात भाजपचे अस्तित्वही नाही. पण ते आता डाव्यांशी दोन हात करीत आहेत, अशी खंत मुख्यमंत्री विजयन यांनी व्यक्त केली.

आजी आणि आईप्रमाणेच दक्षिणेकडील मतदारसंघाची निवड

राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी या १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. १९८० मध्ये त्या आंध्र प्रदेशातील मेडक मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आई सोनिया गांधी या १९९९ मध्ये अमेठीसह कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.

वायनाड मतदारसंघ नेमका आहे कुठे?

केरळातील मलबार प्रदेशात वायनाड, कोझीकोड आणि मल्लापूरम या तीन जिल्ह्य़ांतील तालुक्यांचा मिळून वायनाड हा मतदारसंघ आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकातील म्हैसून विभागाला लागून हा मतदारसंघ आहे. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांशी जोडणारा दुवा म्हणूनच वायनाड मतदारसंघाची निवड करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सांगितले.