अम्मा अर्थात जयललिता यांच्या प्रकृतीबाबत आम्ही त्यावेळी खोटी माहिती दिली होती, अशी धक्कादायक कबुली तामिळनाडूचे वन मंत्री सी श्रीनिवासन यांनी दिली. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर अपोलो रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या तब्बेतीबाबत आम्हाला खोटे बोलायला पक्षाकडून सांगण्यात आले.

जयललिता यांनी इडली खाल्ली, आम्ही त्यांना भेटलो त्यांची प्रकृती आधीपेक्षा सुधारते आहे हे सगळे आम्हाला सांगायला सांगितले होते. आम्ही त्यावेळी खोटे बोललो होतो. जयललिता यांना भेटण्याची संमती कोणालाही देण्यात आली नव्हती हेच सत्य आहे. मी तुम्हा सगळ्यांशी खोटे बोललो, त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो असेही श्रीनिवासन यांनी म्हटले. ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातील ट्विट केले आहे.

आम्हा सगळ्या मंत्र्यांप्रमाणेच ‘एआयएडीएमके’ या पक्षाचे लोकही जयललिता यांच्या प्रकृती बाबत खरी माहिती देत नव्हते. मागील वर्षी २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पक्षाने जयललिता यांच्या प्रकृतीबाबत गुप्तता बाळगायचे ठरवले होते म्हणून आम्ही त्यावेळी तशा प्रतिक्रिया दिल्या, असेही श्रीनिवासन यांनी म्हटले.

२२ सप्टेंबरला जयललिता यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि ५ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या कालावधीत त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांनाच जयललितांना भेटण्याची संमती होती, असेही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.