अफगाणिस्तानात तालिबान, अफगाणी-अमेरिकी लष्करी दले यांच्यात हिंसाचार थांबवण्यासाठी एक आठवडय़ाची शस्त्रसंधी अंशत: लागू करण्यात आली आहे. शनिवारी या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून अफगाणिस्तानात तालिबानचे हल्ले आता थांबण्याची अपेक्षा आहे. असे असले तरी शनिवारी काही किरकोळ हल्ले झाल्याने गालबोट लागण्यास सुरुवात झाली आहे.

अफगाणिस्तानात या शस्त्रसंधीचे नाचून गाऊन रस्तोरस्ती स्वागत करण्यात आले.  तालिबान, अमेरिका व अफगाणी दले यांनी हिंसाचार कमी करण्याचे मान्य केले असून ही शस्त्रसंधी सुरळित पार पडली, तर २००१ मध्ये अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानात आल्यापासून दुसऱ्यांदा हिंसाचार थांबल्याचा काळ अनुभवता येणार आहे. काबूल येथील टॅक्सी चालक हबीब उल्ला यांनी सांगितले की, ‘‘बॉम्ब किंवा आत्मघातकी बॉम्बने मारले जाण्याची भीती न बाळगता प्रथमच बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. ही  शस्त्रसंधी कायम राहो.’’ बाल्ख प्रांतात तालिबानने मझार ए शरीफ या जिल्हा मुख्यालयावर हल्ला केला. त्यात दोनजण ठार झाले.