पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या हिंसाचारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

ही भरपाई देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नसल्याचंही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या हिंसाचारात एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अर्धे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते, अर्धे भाजपाचे आणि एक कार्यकर्ता संयुक्त मोर्चाचा होता, असंही त्यांनी सांगितलं.


दरम्यान, आज गृहमंत्रालयाने नेमलेलं चार सदस्यांचं पथक पश्चिम बंगालमध्ये दाखल झालेलं आहे. घडलेल्या हिंसाचाराची सखोल चौकशी हे पथक करत आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी बंगालमध्ये दाखल झाले. तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. बंगालमधील हिंसाचार हा देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा असून, स्वातंत्र्योत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही, असेही नड्डा म्हणाले होते. त्यामुळे या घटना आता वादाचा मुद्दा ठरत आहेत.

पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.