पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. या संघर्षाचं खापर भारतावर फोडणाऱ्या चीनला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेहमीप्रमाणे चीनने या संघर्षासाठी भारतीय लष्कराला जबाबदार धरलं. या संघर्षाला कारणीभूत असणाऱ्या सैनिकांना भारताने शिक्षा द्यावी अशी मागणी वँग यी यांनी जयशंकर यांच्याकडे केली. त्यावर जयशंकर यांनी ‘गलवाण खोऱ्यामध्ये जे घडलं, ते सर्व पूर्वनियोजित होतं, तुम्ही हे ठरवून केलं’ असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं.

परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चेनंतर आता दोन्ही देशांमध्ये परिस्थिती जबाबदारीने हाताळायची व सहा जून रोजी वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये ठरल्यानुसार तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करायचा निर्णय झाला आहे. द्विपक्षीय करारानुसार सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही बाजू तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती करणार नाहीत असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

भारत आणि चीनने आपल्या नेत्यांमध्ये झालेल्या सहमतीचं पालन केलं पाहिजे असं मत वँग यी यांनी एस जयशंकर यांच्यासमोर मांडलं आहे. तसंच दोन्ही देशांनी मतभेद निर्माण होऊ नयेत यासाठी संवाद व समन्वय बळकट करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत.