पुढील दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता आहे असा अंदाज एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे करोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र येत्या दोन ते तीन महिन्यात करोनावरची लस शोधण्यात यश मिळेल अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

करोना व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. भारत जगात सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. याबाबत डॉ. गुलेरिया यांना विचारलं असता करोनाचे रुग्ण कमी कसे होतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहोत. सध्याच्या घडीला मृत्यू दराचा विचार केला तर जगाच्या तुलनेत भारताचं हे प्रमाण नक्कीच कमी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे.. त्यामुळे येणाऱ्या काळात काही केसेस वाढतील असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या अटी आता हळूहळू शिथिल होत आहेत. अशावेळी आपल्या देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे. बाहेर जाताना मास्क लावणं, हात धुणं, हँड सॅनिटायजरचा वापर करणं या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्याच लागतील. लॉकडाउन संपला म्हणजे करोनाचा धोका टळला असे नाही. लॉकडाउनच्या अटी शिथिल होऊ लागल्या असल्या तरीही करोना व्हायरस आहेच. त्यामुळे देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे.

याचवेळी डॉ. गुलेरिया यांना करोनावर लस कधी सापडेल याबाबत काय सांगू शकाल? हे विचारण्यात आलं तेव्हा पुढच्या दोन ते तीन महिन्यात करोनावरची लस मिळू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. थोडा आणखी कालावधी लागलाच तर या वर्षाच्या शेवटापर्यंत आपण लस शोधण्यात यशस्वी होऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.