उत्तर कोरिया…हुकूमशहा किम जाँग ऊन यांचे तुघलकी फर्मान, क्षेपणास्त्र चाचणी आणि आण्विक कार्यक्रम यामुळे हा देश नेहमीच चर्चेत असतो…अशा या देशात भारताच्या राजदूतपदाची धूरा आता एका मराठी माणसाकडे सोपवण्यात आली आहे. अतुल गोतसुर्वे हे भारताचे उत्तर कोरियातील राजदूत असतील. गोतसुर्वे यांनी कार्यभार स्वीकारताच परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी गेल्या आठवड्यात दोन दिवसांचा उत्तर कोरियाचा दौरादेखील केला आहे. या ऐतिहासिक दौऱ्याचे श्रेय सिंह यांच्यासह गोतसुर्वे यांना देखील दिले जात आहे.

कोण आहेत गोतसुर्वे?
अतुल गोतसुर्वे यांचा जन्म १९७६ मध्ये सोलापूरमध्ये झाला. त्यांनी पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला. यानंतर त्यांनी पुणे एमआयटीमधून बीई आणि सीओईपी, पुणेमधून एमई केले. याशिवाय त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एलएलबीदेखील केले आहे.

१९९९-२००० या कालावधीत त्यांनी सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. १९९८ मध्ये त्यांनी इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिस या परीक्षेत यश मिळवले. ते चार वर्ष केंद्रीय जल आयोगात कार्यरत होते. भूतानमधील जलप्रकल्पांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. यानंतर त्यांची परराष्ट्र खात्यात निवड झाली.

गोतसुर्वेंनी कुठे काम केले?
गोतसुर्वे यांनी मेक्सिकोतील (२००६-०७) भारतीय दुतावासात काम केले आहे. याशिवाय क्यूबातील (२००७-१०) भारतीय दुतावासातही त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. एप्रिल २०१४ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत त्यांनी पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाची धूराही सांभाळली. सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ते इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन विभागाचे संचालक होते.

गोतसुर्वेंसमोरील आव्हाने?
उत्तर कोरियाचे अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान व अन्य देशांशी तणावपूर्ण संबंध आहेत. सध्या हा तणाव करण्यासाठी किम जाँग ऊन यांनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली होती. तर आगामी काळात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील भेट घेणार आहेत. या भेटीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. पण किम जाँग ऊन यांच्या सारख्या हुकूमशहा असलेल्या देशात काम करणे गोतसुर्वे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. उत्तर कोरियाच्या राजदूतपदी नियुक्ती होताच गोतसुर्वे यांनी दक्षिण कोरियाच्या पराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. उत्तर कोरियात बऱ्याच वर्षांनी परराष्ट्र खात्यातील अधिकारी राजदूत म्हणून पाठवण्यात आला आहे. अशा स्थितीत दक्षिण कोरियाला चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून गोतसुर्वे यांनी दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. किम जाँग ऊन यांना एखादा निर्णय पटला नाही, तर थेट कारवाईची शक्यता असते. अशा स्थितीत काम करणे ही एक परीक्षाच असते. उत्तर कोरियातील जबाबदारी गोतसुर्वे समर्थपणे पार पडतील, हे नक्की.

व्ही के सिंह यांचा उत्तर कोरिया दौरा
५ मे रोजी गोतसुर्वे यांनी उत्तर कोरियात भारतीय राजदूत पदाची धूरा सांभाळली. यानंतर जवळपास नऊ दिवसांनी त्यांना किम याँग नाम यांनी भेटीसाठी निमंत्रित केले. हुकूमशहा किम जाँग ऊन यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश आहे. या भेटीच्या दुसऱ्याच दिवसी व्ही के सिंह हे उत्तर कोरियात पोहोचले. सिंह आणि गोतसुर्वे या दोघांनीही हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी अथक मेहनत घेतली आणि याचा परिणाम म्हणजे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल पुढे टाकले.