जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईदच्या दिवशी सुरक्षादलांवर करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे इस्लामचे नाव खराब झाले असल्याची टीका ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाचे दिवाण जैनुल आबेदिन यांनी केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी आयसीस आणि पाकिस्तानचे झेंड फडकवणाऱ्या प्रवृत्तींवर निशाणा साधत अशा व्यक्ती या दहशतवादी असल्याचे सिद्ध होतात असे म्हटले. अनंतनाग येथे पोलिसांच्या वाहनावर आंदोलकांनी दगडफेक केली होती.

यावेळी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांना झालेल्या धक्काबुक्कीचाही निषेध केला. फारूख अब्दुल्ला हे श्रीनगर येथील एका दर्गामध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. अब्दुल्ला हे तेथून जाण्यास उठताच घोषणाबाजी करणाऱ्या काही लोकांनी हातात पादत्राणे घेऊन ‘शर्म करो, शर्म करो’ आणि ‘आझादी’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी अशा प्रकारांना आपण घाबरत नसल्याचे म्हटले. अशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळेल असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी प्रथम बेकारी, भूकबळी आणि रोगराईपासून स्वातंत्र्य मिळवावे, असा टोला लगावला होता.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयींच्या शोकसभेत अब्दुल्ला यांनी भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा दिल्या होत्या. त्यांच्या या घोषणाबाजीवर काही लोक नाराज होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.