26 February 2021

News Flash

चिंताजनक: बंदिस्त व गर्दीच्या जागी हवेतून पसरू शकतो करोना; WHO चं शिक्कामोर्तब

तीन दिवसांपूर्वी ३२ देशांमधील २३९ शास्त्रज्ञांनी कोविड-१९ हवेद्वारे पसरू शकतो असं मत नोंदवलं होतं

इनऑर्बिट मॉल हा गुरुवारी आतून पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. (प्रातिनिधिक छायाचित्र)

हवेतून करोनाच्या विषाणूची बाधा होऊ शकते अशी भीती ३२ देशांमधल्या २३९ शास्त्रज्ञांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. चिंतेची बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा WHO) यावर शिक्कामोर्तब केले आहे. संघटनेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये बंदिस्त जागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी हवेच्या माध्यमातून करोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

तीन दिवसांपूर्वी ३२ देशांमधील २३९ शास्त्रज्ञांच्या समूहानं जागतिक स्तरावरील वैदयकीय तज्ज्ञांना आवाहन केलं होतं की “कोविड-१९ हवेद्वारे पसरू शकतो या शक्यतेचा गांभीर्यानं विचार करा.”

अनेक घटनांचा अभ्यास केल्यानंतर WHO नं नमूद केलं आहे की, “काही ठिकाणचा करोनाचा उद्रेक बघता, बंदिस्त जागी गर्दी होत असेल तर हवेद्वारे अर्थातच ड्रॉपलेट्सच्या सोबतीनं करोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” रेस्टॉरंट्स, फिटनेस सेंटर्स, समूहगानासारख्या जागा अशा घटनांमध्ये असा प्रसार झाल्याचं दिसून आल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

बंदिस्त जागा, जिथं हवा पुरेशी खेळती नसते आणि अशा ठिकाणी गर्दी असेल व बराच काळासाठी करोनाबाधित व्यक्ती तिथं असेल तर हवेमधूनही इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं WHO नं नमूद केलं आहे.

अर्थात, केवळ व केवळ हवेमार्गे करोनाचा प्रसार अशा स्थितीत होणं कठीण आहे आणि हवेमार्गे व ड्रॉपलेटच्या माध्यमातून असा दोन्ही मार्गे प्रसार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

करोनाबाधिताच्या शिंकेद्वारे, खोकल्याद्वारे ड्रॉपलेट (शिंतोडे) बाहेर पडणं व त्यामुळे प्रसार होणं हेच अद्यापतरी गृहीतक असल्याचंही संघटनेने नमूद केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी विशिष्ट वैद्यकीय कृती वगळता हवेच्या माध्यमातून करोनाचा प्रसार ही काळजी नसल्याचं WHO चं आधीच म्हणणं होतं, जे बदललेलं दिसत आहे. तसेच या संदर्भात अत्यंत उच्च दर्जाच्या संशोधनाची गरजही व्यक्त करण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 6:22 pm

Web Title: who says corona may spread via air in indoor crowded spaces
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ICSE, ISC बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर
2 “…तर योगी आदित्यनाथ यांचं दुबे कनेक्शन होतं हे मानायचं का?”
3 ‘आयसीएसई’चा दहावी, बारावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पहायचा निकाल?
Just Now!
X