पनामा पेपर्समध्ये उल्लेख असलेले बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्ती कार्यक्रमातील उपस्थितीवर काँग्रेसने बोट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या खळबळजनक पनामा पेपर्समध्ये अमिताभ हे चार परदेशी कंपन्यांचे संचालक असल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे अमिताभ यांनी संपत्तीवरील करचुकवेगिरीसाठी ही पळवाट काढल्याचा संशय उत्त्पन्न झाला होता. यानंतर केंद्र सरकारने याप्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता २८ मे रोजी होणाऱ्या मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्ती कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अमिताभ उपस्थित राहणार असल्याने काँग्रेसने शंका उपस्थित केली आहे. या कार्यक्रमाच्या काही भागाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करणार आहेत. अमिताभ यांनी रालोआ सरकारच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, त्यामुळे पनामा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांना कोणता संदेश जाईल, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. याबद्दल अभिषेक बच्चन याला विचारण्यात आले असता त्याने म्हटले की, ते कोणत्याही राजकीय व्यासपीठावर उपस्थित लावणार नाहीत. ते स्त्री शिक्षणाशी संबधित कार्यक्रमाचा भाग असल्याचे अभिषेक बच्चनने स्पष्ट केले.