तेलगू देसम पार्टीचे प्रमुख व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीदिनी आदरांजली वाहणारे ट्विट सकाळी केले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी ते ट्विट डिलीट केल्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज सावरकरांची पुण्यतिथी आहे. जे स्क्रीनशॉट्स ट्विटरवर शेअर होतायत, त्यानुसार नायडू यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. थोर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरजी यांना श्रद्धांजली अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त केली. त्यावर त्यांच्या फोलोअर्सनीदेखील चांगला प्रतिसाद दिला होता.

परंतु नंतर नायडूंनी सदर ट्विट डिलीट केल्याचे आढळले. नायडूंचा तेलगू देसम हा पक्ष रालोआचा घटकपक्ष आहे. मात्र, भाजपा व तेलगू देसम यांचे संबंध सध्या ताणलेले आहेत. भाजपा वापरत असलेला हिंदुत्व हा शब्द सावरकरांची देणगी आहे. एकंदरच सावरकरांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला ममत्व आहे. अशा भाजपाशी संबंध तणावाचे असल्यामुळे नायडूंनी ते ट्विट डिलीट केले असावे अशी चर्चा आहे. भाजपा सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक मानते, परंतु काँग्रेससह अनेक विरोधक मानतात की भारताच्या स्वातंत्र्यचळवळीमध्ये सावरकरांचा सहभाग नव्हता. महात्मा गांधींच्या चले जाव चळवळीला सावरकरांचा पाठिंबा नव्हता असा दाखला विरोधक विशेषत: काँग्रेस देतात. सावरकर त्यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, त्यांनी 1942 मध्ये चले जाव चळवळीवर बहिष्कार टाकावा असे पत्र आपल्या अनुयायांना लिहिले होते, त्यामुळे सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक म्हणता येणार नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे.

महासभेचे अनुयायी ज्या कुठल्या सरकारी पदावर आहेत त्यांनी तिथंच रहावं आणि कुठल्याही परिस्थितीत चले जाव चळवळीत सामील होऊ नये असं आवाहन केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तर सावरकरांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकलं होतं आणि त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरवण्यासाठी इतका पुरावा पुरेसा आहे असं संघपरीवाराचं म्हणणं आहे. सावरकरांना क्रांतीकारी चळवळीचा भाग म्हणून 1910 मध्ये अटक करण्यात आली आणि 50 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली, मात्र नंतर त्यांना 1921 मध्ये सोडण्यात आले. अन्य क्रांतीकारकांप्रमाणे न वागता सावरकरांनी दयेची याचना केली त्यामुळे ते स्वातंत्र्यसैनिक नव्हेत अशी काँग्रेस व विरोधकांची भूमिका आहे.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक भाजपा नेत्यांनी सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे, त्याचप्रमाणे तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीही वाहिली, मात्र मागाहून टे ट्विट डिलीट केल्यामुळे, त्यांनी असं का केलं असावं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.