आणीबाणीच्या काळात तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधीचा मुलगा संजय गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, संघाच्या नेत्यांनी संजय गांधी यांचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला, अशी माहिती अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने पाठविलेल्या केबल्समधून उघड झालीये. विकिलीक्सने या केबल्स उघड केल्या आहेत.
आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी संघ आणि केंद्र सरकार यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला होता. १४ डिसेंबर १९७६ मध्ये अमेरिकेच्या दूतावासाने पाठविलेल्या एका केबलमध्ये संजय गांधी आपला वाटाघाटींचा प्रस्ताव घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेले होते, अशी माहिती ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र, त्यावेळी संघाने संजय गांधींचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता.
त्याकाळी भारतामध्ये संघाच्या असलेल्या प्रभावाबद्दल या केबलमध्ये म्हटले आहे की, वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेकांनी यूथ कॉंग्रेसमध्ये नावनोंदणी केली आहे. यूथ कॉंग्रेसमध्ये ते हेरगिरी करण्यामध्ये गेले होते का, याची माहिती मात्र मिळालेली नाही.
आणीबाणीच्या पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील सत्ताधाऱयांविरोधातील सर्वांत प्रभावी राजकीय संघटना होती. संघटनेच्या गाव आणि शहर पातळीवर अनेक शाखाही होत्या, असेही या केबलमध्ये लिहिले आहे.